श्री विठ्ठल दर्शन काही दिवस बंद? 

अभय जोशी 
शुक्रवार, 13 मार्च 2020

पंढरपूर (सोलापूर) : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन काही दिवसांपुरते बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे. या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दोन दिवसांत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती "सकाळ'शी बोलताना दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन काही दिवसांपुरते बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे. या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दोन दिवसांत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती "सकाळ'शी बोलताना दिली. 
जागतिक आरोग्य संघटनेने "कोरोना'ला जागतिक साथ घोषित केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी जगभरात विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही दिवस राज्यातील शासकीय कार्यक्रम, यात्रा, उत्सव बंद करावेत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर 
सॅनिटायझरचे दोन थेंब टाकले जात आहेत. तथापि ही उपाययोजना पुरेशी आहे का याचा विचार होण्याची गरज आहे. पदस्पर्श दर्शन हे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील वैशिष्ट्य आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या बहुतांश भाविकांकडून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. दररोज शेकडो भाविकांकडून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेताना विठ्ठलाच्या पायास भाविकांचे डोके, नाक आणि हाताने स्पर्श केला जात आहे. त्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रसार होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान काही दिवस दक्षता म्हणून आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद करता येईल काय याचा विचार होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना विचारले असता हा विषय अतिशय गंभीर असून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे असे सांगून दोन-तीन दिवसांत संबंधितांशी बोलून कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Vitthal Darshan will be closed for a few days