विठुरायाही भारावला देशभक्तीने ! प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुरायाला तिरंग्याची आरास ! 

भारत नागणे 
Tuesday, 26 January 2021

विठुरायाच्या गाभाऱ्यात केशरी झेंडू, पांढरा मोगरा आणि हिरव्या तुळशीच्या पानांचा वापर करून तिरंग्यामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर अधिक खुलून दिसत आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : आज देशभर 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने विठ्ठल आणि रुक्‍मिणी मातेला आज तिरंग्याची आरास करून मंदिर समितीतर्फे देशाप्रति असलेली सद्‌भावना व्यक्त करण्यात आली आहे. 

येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध सण - समारंभ आणि राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने नेहमीच विठ्ठल मंदिरात देवाला विविध पाना - फुलांची आणि फळांची आरास करून सण व उत्सव साजरे केले जातात. आज 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे येथील भाविक अण्णा चव्हाण यांनी विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात विविध फुलांपासून तिरंग्याची आरास करून आपली सेवा विठुचरणी अर्पण केली आहे. 

विठुरायाच्या गाभाऱ्यात केशरी झेंडू, पांढरा मोगरा आणि हिरव्या तुळशीच्या पानांचा वापर करून तिरंग्यामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे देवाचा गाभारा आणि मंदिर अधिक खुलून दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विठुरायाला आज पांढऱ्या आणि लाल रंगाचा पोषाख परिधान करून गळ्यात तिरंग्याचे उपरणे घालण्यात आले आहे, तर रुक्‍मिणी मातेलाही केशरी रंगाची साडी परिधान करून तिरंग्याचे उपरणे आणि फुलांचा हार घालण्यात आला आहे. 

सभा मडंप, सोळखांबी आणि प्रवेश द्वारावरही फुलांची सजावट करण्यात आली आहे. यासाठी सुमारे एक टनाहून अधिक फुलांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या इतर भागात तिरंग्याची झालर लावून मंदिर अधिक सजवले आहे. आज साक्षात विठुराया देखील देशभक्तीने भारावल्याचे मंदिरात भासत आहे. देवाचे हे देखणे आणि लोभस रूप पाहण्यासाठी भाविकांनीही आज मोठी गर्दी केली आहे. 

सलग सुट्यांमुळे पंढरीत गर्दी 
सलग सुट्यांमुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपासून पंढरीत भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने सर्व नियम पाळून भाविकांसाठी दर्शन खुले केले आहे. त्यानंतर विनापास मुखदर्शन सुरू केल्याने भाविकांची संख्या वाढली आहे. मंदिर परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthal Rukmini temple decorated with tricolor flowers on the occasion of Republic Day