विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील ऐतिहासिक वास्तू कलेचा उत्कृष्ट ठेवा असलेल्या दीपमाळेचे देखणे रूप आले समोर 

भारत नागणे 
Monday, 28 September 2020

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या लाकडी सभामंडपात असलेल्या दगडी दीपमाळांनी मोकळा श्वास घेतला असून, त्यांच्या सौंदर्याचे रूपडे आता अधिकच खुलून दिसू लागले आहे. ऐतिहासिक वास्तू कलेचा उत्कृष्ट ठेवा असलेल्या या दीपमाळांनी मंदिर उजळून निघणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या लाकडी सभामंडपात असलेल्या दगडी दीपमाळांनी मोकळा श्वास घेतला असून, त्यांच्या सौंदर्याचे रूपडे आता अधिकच खुलून दिसू लागले आहे. ऐतिहासिक वास्तू कलेचा उत्कृष्ट ठेवा असलेल्या या दीपमाळांनी मंदिर उजळून निघणार आहे. 

पुरातन असलेल्या येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात अलीकडच्या काळात काही बदल करण्यात आले होते. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी मंदिर समितीने पुरातत्त्व खात्याची मदत घेतली आहे. पुरातत्त्व विभागाने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांची मंदिर समितीने तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. 
शिवाय मंदिरातील सभामंडपातील काही अनावश्‍यक केलेले बांधकाम काढण्याचे काम सुरू केले आहे. 

पेशवेकालीन लाकडी सभामंडपातील गरुड आणि हनुमान मूर्तीवर टाकण्यात आलेला स्लॅब काढून टाकण्यात आला आहे. यामुळे या दोन्ही मंदिरांच्या मागे झाकोळून गेलेल्या दगडी दीपमाळांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. सभामंडपातील या बांधकामामुळे पुरातन काळापासून असलेल्या दोन्ही दीपमाळा अनेक वर्षांपासून झाकोळून गेल्या होत्या. सभामंडपातील दोन्ही मंदिरांवरील छत काढल्याने या दीपमाळांचे आकर्षक व देखणे रूप भाविकांना पाहता येणार आहे. याशिवाय, मूर्तींवरील छत काढून टाकल्यामुळे सभामंडपात अधिक सूर्यप्रकाश वाढला आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मंदिर बंद काळात मंदिरात अनेक आवश्‍यक बदल केले आहेत. देवाच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशा काढल्या आहेत. मंदिरातील बंद असलेले झरोकेदेखील खुले केले आहेत. यामुळे मंदिरात खेळती हवा आणि स्वच्छ प्रकाश वाढला आहे. विठ्ठल मूर्ती आणि मंदिराचे संवर्धन करण्यासाठी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. समितीच्या या निर्णयाचे आणि कामाचे वारकरी आणि भाविकांमधून स्वागत केले जात आहे. 

याबाबत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी म्हणाले, विठ्ठल मंदिरातील पेशवेकालीन लाकडी सभामंडपात गरुड आणि हनुमान मूर्तीवर स्लॅब टाकण्यात आला होता. त्यामुळे या मंदिराच्या मागे असलेल्या दगडी दीपमाळा झाकोळून गेलेल्या होत्या. मूर्तींवरील छत काढल्याने दीपमाळांचे देखणे रूप समोर आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Vitthal-Rukmini temple there is a beautiful Deepmala a place of historical architecture