महापालिकेतील 18 जणांनी मागितली स्वेच्छानिवृत्ती ! सहाय्यक अभियंत्यांसह उपअभियंत्यांचाही समावेश 

तात्या लांडगे 
Friday, 23 October 2020

महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता, गलिच्छ वस्ती सुधार योजना, आरोग्य, अतिक्रमण, विधान सल्लागार, भूमी व मालमत्ता, सामान्य प्रशासन विभागासह एक, तीन, चार, सहा, सात, आठ या झोन कार्यालयातील तब्बल 18 जणांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विशेषत: सप्टेंबर ते ऑक्‍टोबर या दीड महिन्यांत या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. 

सोलापूर : महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता, गलिच्छ वस्ती सुधार योजना, आरोग्य, अतिक्रमण, विधान सल्लागार, भूमी व मालमत्ता, सामान्य प्रशासन विभागासह एक, तीन, चार, सहा, सात, आठ या झोन कार्यालयातील तब्बल 18 जणांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विशेषत: सप्टेंबर ते ऑक्‍टोबर या दीड महिन्यांत या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. 

शहरातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. दुसरीकडे शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, कोरोनामुळे 50 टक्‍क्‍यांनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने घरी बसविले जात आहे. तर दुसरीकडे लिपिक पदावर पदोन्नती मिळूनही अनेकांना संगणक व संगणकावरील टायपिंग येत नाही. त्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी लिपिकांची संगणक व टायपिंग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात 30 टक्‍क्‍यांपर्यंत लिपिक परीक्षा उत्तीर्ण झाले. आता प्रशासनाचा कारभार गतिमान व्हावा या हेतूने आयुक्‍तांनी त्यांना दुसरी संधी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात लिपिकांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. त्या प्रयत्नात अनुत्तीर्ण होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्‍तांनी दिला आहे. त्याची धास्ती घेऊन काहीजण स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

"यांनी' दिले स्वेच्छानिवृत्तीचे प्रस्ताव 
विजयकुमार राठोड, एच. एस. आदलिंगे, विजय जोशी (सहायक अभियंता), एस. के. उस्तुरगे (उपअभियंता), ए. ए. जोशी, आर. एस. लिंबितोटे (आवेक्षक), अंजली बटगिरे (मिश्रक), यल्लम्मा अड्डाकूल, रुक्‍मिणी स्वाके, कलावती गागडे (सफाई कामगार), एस. एस. राठोड, ए. एस. देगावकर, एस. के. होटकर, के. एम. मुल्ला, एम. एम. यलगुलवार, एस. एम. गिडवीर, एस. एस. ओगले व व्ही. टी. म्हेत्रे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यातील मुल्ला, होटकर, राठोड, देगावकर, विजय जोशी, बटगिरे व गागडे यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित अर्जांवर निर्णय झालेला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voluntary retirement of 18 people in the Solapur Municipal corporation