"पुणे पदवीधर' उमेदवारांसाठी बजावणार मोहोळ तालुक्‍यातील 4090 मतदार मतदानाचा अधिकार 

राजकुमार शहा 
Friday, 13 November 2020

पुणे पदवीधर मतदार संघातील पदवीधर उमेदवारांसाठी मोहोळ तालुक्‍यातील 3 हजार 333 मतदार तर शिक्षक मतदार संघातील उमेदवारासाठी 757 असे एकूण 4 हजार 90 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 

मोहोळ (सोलापूर) : पुणे पदवीधर मतदार संघातील पदवीधर उमेदवारांसाठी मोहोळ तालुक्‍यातील 3 हजार 333 मतदार तर शिक्षक मतदार संघातील उमेदवारासाठी 757 असे एकूण 4 हजार 90 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 

यासंदर्भात नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी एकूण सात मतदान केंद्राध्यक्ष तर शिक्षक निवडणुकीसाठी पाच मतदान केंद्राध्यक्ष नियुक्त केले आहेत. दोन्ही निवडणुकांसाठी तीन क्षेत्रीय अधिकारी व दोन राखीव अशा पाच जणांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तीन भरारी पथके तैनात केली आहेत. एका पथकात तीन जणांचा समावेश आहे. 

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी (ता. 13) छाननी होणार आहे, तर 17 नोव्हेंबरपर्यंत दाखल केलेले उमेदवारी अर्ज काढून घेता येणार आहेत. मतदान 1 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत होणार आहे, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पदवीधरांसाठी एकूण सात मतदान केंद्रे तर शिक्षकांसाठी पाच मतदान केंद्रे आहेत. दरम्यान, शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय सावंत यांच्या बाहेरील तीन जिल्ह्यांत तीन प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यात त्यांचा प्रचार सुरू आहे. निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी नायब तहसीलदार लिंबारे यांच्यासह मोईन डोणगावकर, महेंद्र नवले, मनोज पुराणिक व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत. 

अशी आहे निवडणुकीची मोहोळ तालुक्‍याची वस्तुस्थिती 

  • पदवीधर एकूण मतदार : 3 हजार 333 
  • शिक्षक मतदार : 757 

पदवीधरसाठी अशी आहेत मतदान केंद्रे 

  • मोहोळ -2, नरखेड - 1, शेटफळ - 1, सावळेश्वर - 1, टाकळी सिकंदर - 2, एकूण -7 

शिक्षकसाठी अशी आहेत मतदान केंद्रे 

  • मोहोळ - 1, नरखेड - 1, शेटफळ - 1, सावळेश्वर - 1, टाकळी सिकंदर - 1, एकूण - 5 
  • एकूण भरारी पथके - 3 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voters from Mohol taluka will cast their votes for the candidate from Pune graduate constituency