
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये सर्व सार्वाजनिक ठिकाणे बंद झाली होती. त्यानंतर एकेक करत सर्व काही सुरू झाले. बाजार, हॉस्पिटल, मंदिरे, सभागृह, चित्रपटगृहे सर्व सुरू झाले तरी अद्याप सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय बंदच आहे.
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये सर्व सार्वाजनिक ठिकाणे बंद झाली होती. त्यानंतर एकेक करत सर्व काही सुरू झाले. बाजार, हॉस्पिटल, मंदिरे, सभागृह, चित्रपटगृहे सर्व सुरू झाले तरी अद्याप सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय बंदच आहे. बच्चे कंपनीसाठी प्राणी संग्रहालय हे मौज-मजा करण्याचे ठिकाण, ते सुरू होण्याची वाट लहानगी मुले पाहात आहेत. मात्र अनलॉकमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणे सुरू झाली तरी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सुरू होण्यासाठी अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणकडून अनेकदा पाठपुरावा करून तसेच तीनवेळा नोटिसा देऊनही नेमून दिलेल्या 35 बाबींची पूर्तता न झाल्याने महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता धोक्यात आली आहे. या अनुषंगाने शनिवारी (ता. 6) महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह नॅचरल कॉन्झर्व्हेशन सर्कलचे भरत छेडा, पप्पू जमादार, आम आदमी पार्टीचे असलम शेख, रॉबर्ट हुडन यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शक तत्त्वांची त्वरित पूर्तता करून ताबडतोब प्राणी संग्रहालय सुरू करसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत नॅचरल कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सात जणांची समिती स्थापन करण्यात यावी, वन्यजीव प्रेमींना सोबत घेऊन प्राणी संग्रहालयाचे कामकाज करण्यात यावे, दर महिन्याला अहवाल सादर करण्यात यावा व प्राणी संग्रहालयात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, प्राणी संग्रहालयाच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यात यावे, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. मागील अनेक दिवसांत प्राणी संग्रहालय बंद असल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.
सध्या महाराष्ट्रात अजून कुठेही प्राणी संग्रहालय सुरू झालेले नाही. मान्यता असली तरी कोरोना व बर्ड फ्लूची परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. उद्याने देखील केवळ सकाळ व सायंकाळी वॉकिंग करिता सुरू असतात. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत प्राणी संग्रहालय बंदच ठेवावे लागणार आहे.
- नितीन गोठे,
संचालक, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय
संपादन : श्रीनिवास दुध्याल