"अधिकाऱ्यांचं कुटुंब' ! वडील पोलिस, भाऊ तहसीलदार, बहीण आयएएस तर दुसरी सहाय्यक संचालक

Wakade Family
Wakade Family

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : जिद्द, चिकाटी व त्याला प्रयत्नांची जोड व योग्य मार्गदर्शक असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही, याचा प्रत्यय माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक या गावात पाहायला मिळतो. वडिलांनी नोकरी करत असताना मुलांना प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला अन्‌ मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे आज या एकाच कुटुंबात जवळपास चार अधिकारी असून, वडील पोलिस, भाऊ तहसीलदार एक बहीण वित्त व लेखा विभागात सहाय्यक संचालक तर दुसरी बहीण आयएएस व लहान भाऊ पदवीधर आहे. 

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भावंडांचे जिद्दीने प्रयत्न 
उपळाई बुद्रूक येथील तानाजी वाकडे हे सध्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. साधी राहणीमान व उच्च विचारसरणी असलेले हे व्यक्तिमत्त्व. दोन मुले, दोन मुली व पती-पत्नी असे त्यांचे सहा जणांचे कुटुंब. पोलिस दलात नोकरी करत असल्याने त्यांची सतत या गावातून त्या गावात बदली होत असे. त्यामुळे मुलांच्या शाळेत सतत बदल होत असायचा. परंतु ते मात्र मुलांच्या शिक्षणाकडे किंचितही दुर्लक्ष करत नसत. ते प्रशासन जवळून अनुभवत असल्याने आपल्या मुलांनी देखील अशा उच्च पदांवर विराजमान व्हावेत असे त्यांना सतत वाटत असल्याने, ते मुलांना त्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असत. वडिलांची तळमळ बघून मुलं देखील त्या जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत. 

भावाचे अपयश पाहून बहिणीला अश्रू 
प्रथम मोठा मुलगा अमरदीप व मुलगी मीनाक्षी या दोघांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. वडिलांचे मार्गदर्शन व बहिणींचे पाठबळ यामुळे अमरदीप यांनी पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. परंतु, एवढ्यावरच न थांबता पुढेही त्यांनी अभ्यास सुरू केला. अमरदीप व बहीण मीनाक्षी यांनी एकत्रित राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात मीनाक्षी यांची वित्त व लेखा विभागात सहाय्यक संचालक म्हणून निवड झाली होती. त्यामुळे घरात आनंदोत्सवाचे वातावरण असताना देखील बहीण नाखूष होती. कारण, मोठे बंधू अमरदीप यांना यशाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले होते. बहिणीची आपल्याला मिळालेल्या अपयशाची तळमळ बघून न खचता, पुन्हा जिद्दीने अभ्यास करून अमरदीप यांनी दुसऱ्या वर्षात तहसीलदार या पदाला गवसणी घातली. 

तिसऱ्या प्रयत्नात अश्‍विनी यांनी घातली यशाला गवसणी 
वडिलांनी बघितलेली स्वप्ने दोन मुलांनी पूर्ण केली होती. प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर दोन मुले असल्याने आई-वडिलांना आनंदाचा पारावार उरला नव्हता. त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते. परंतु, तानाजी वाकडे यांनी दुसरी मुलगी अश्विनी हिच्याकडे "तुला अधिकारी व्हायचे असेल तर यापेक्षा मोठी अधिकारी झाली पाहिजे' अशी अपेक्षा बाळगून होते. त्यामुळे अश्विनी वाकडे यांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी पदाची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पुन्हा प्रयत्न केले तरी देखील अपयश आले. त्या वेळी भाऊ अमरदीप वाकडे व बहीण मीनाक्षी वाकडे यांनी अश्विनीला "तू अधिकारी होऊ शकतेस' असा धीर दिला. आणखी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अश्विनी यांनी पुन्हा चिकाटीने अभ्यास करत प्रशासनातील सर्वोच्च पद मिळवायचे ध्येय उराशी बाळगून परीक्षेस सामोरे गेल्या व नुकत्याच ऑगस्ट 2020 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या निकालात अश्विनी यांनी तिसऱ्या प्रयत्नात आयएएस पदाला गवसणी घातली आहे. 

अधिकाऱ्यांचे कुटुंब म्हणून मिळवला लौकिक 
वडिलांनी मुलांना लहानपणी दाखवलेली मोठी स्वप्ने मुलांनी पूर्ण केली असून, तानाजी वाकडे यांच्या चौथ्या मुलाचे पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आज वाकडे कुटुंबात वडील तानाजी वाकडे सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक तर मुलगा अमरदीप वाकडे तहसीलदार (कराड), दुसरी मुलगी मीनाक्षी वाकडे वित्त व लेखा विभागात सहायक संचालक (लातूर), तिसरी मुलगी अश्विनी वाकडे आयएएस झाल्याने "अधिकाऱ्यांचे कुटुंब' म्हणून या कुटुंबीयांकडे पाहिले जात आहे. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गावात वेगळी ओळख 
आजपर्यंत आपण सैनिकांचे गाव, पोलिसांचे गाव, पुस्तकांचे गाव अशी अनेक गावे बघितली आहेत. त्यात माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक या गावाने गेल्या काही वर्षांपासून वेगळी ओळख निर्माण केली, ती म्हणजे "प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गाव'. त्यात आणखी भर म्हणून अधिकाऱ्यांच्या गावात असलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कुटूंब म्हणून वाकडे कुटुंबाची ओळख होत आहे. यापूर्वी या गावातील एकाच कुटुंबातील रोहिणी भाजीभाकरे (आयएएस) तर डॉ. संदीप भाजीभाकरे (डीसीपी, मुंबई) या एकाच कुटुंबातील बहीण-भावाने यश मिळवलेले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com