ज्ञानमंदिराच्या संरक्षक भिंतीवर फिरवला बुलडोझर ! पोखरापूर येथील प्रकार; मोहोळ-पंढरपूर पालखीमार्गाचे काम

ZP School
ZP School

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ - पंढरपूर पालखी मार्गाचे पोखरापूर (ता. मोहोळ) येथे काम सुरू असून, या मार्गात जिल्हा परिषद शाळा व तिची संरक्षक भिंत येत आहे. संबंधित ठेकेदाराने सोमवारी मध्यरात्री संपादित जागेतील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीस कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे बुलडोझर फिरवून जमीनदोस्त केली. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावातील ज्ञानमंदिरावर बुलडोझर फिरवल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच, मोहोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

सध्या मोहोळ - पंढरपूर पालखी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोखरापूर येथील संपादित क्षेत्रातील अपेक्षित मोबदला मिळविण्यासाठी त्या-त्या जमिनी व जागेच्या मालकांचे वाद आहेत. पोखरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची इमारत संपादित क्षेत्रात येत असल्याने हे पाडकाम करण्याअगोदर पोखरापूर ग्रामपंचायत किंवा शाळा व्यवस्थापन समितीस तशी पूर्वसूचना देणे आवश्‍यक होते. तसेच त्या अगोदर शाळेची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत थांबणेही आवश्‍यक होते. परंतु, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना येनकेन मार्गाने वेळेत काम पूर्ण करावयाचे आहे. स्थानिक पातळीवर संबंधित शेतकऱ्यांना वेठीस धरून मनमानीपणे कामकाज करण्याचा प्रकारही सुरू असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला . 

रात्री बुलडोझरने शाळेची संरक्षक भिंत पाडण्याचा आवाज आल्यानंतर जागरूक ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन चौकशी व पाहणी केली. पोखरापूर ग्रामस्थांनी या कृत्याचा निषेध केला असून, शाळा इमारतीची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर ठेकेदाराचे काम सुरू करू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. शाळेसाठी पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत, शाळा इमारत पाडण्याचे कामकाज करू नये, असे सांगून पाडलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी तातडीने पत्र्याची संरक्षक भिंत उभारावी, असे संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधींना मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी बजावले. शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये, अशा सूचनाही संबंधितांना दिल्या. 

या वेळी मोहोळ पोलिस ठाण्यात झालेल्या चर्चेत पोखरपूरच्या सरपंच नंदा लेंगरे, उपसरपंच आशिष आगलावे, हर्षद दळवे, संदीप दळवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल कदम, राजकुमार दळवे, अंकुश दळवे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, मंगळवारी वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, माध्यमिकचे संजय राठोड, पोलिस निरीक्षक अशोक सायकर, नॅशनल हायवेचे अनिल विपत, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी येऊन पाहणी करून संबंधित ठेकेदाराला शाळेची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत थांबण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे काहीसा तणाव निवळला. 

संरक्षक भिंत पाडण्याअगोदर ठेकेदाराने मुख्याध्यापकांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते. सध्या तणाव निवळला आहे. 
- अशोक सायकर, 
पोलिस निरीक्षक, मोहोळ 

संबंधित ठेकेदाराने रात्री अचानक संरक्षक भिंत पाडण्याचे काम सुरू केले. जागरूक नागरिकांनी काम थांबविले. शाळा इमारत पाडण्यास आमचा विरोध नाही; परंतु शिक्षणासारखा महत्त्वाचा विषय असल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत संबंधित विभागाने शाळेचे पाडकाम थांबवावे, असे आमचे मत आहे. आम्ही सहकार्य करू. 
- आशिष आगलावे, 
नूतन उपसरपंच, पोखरापूर 

ग्रामस्थांच्या शाळेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या महिनाभरात तो प्रश्न मार्गी लागेल. त्यानंतर पाडकाम करायला अडचण असणार नाही. 
- सिद्धेश्वर निंबर्गी, 
गटशिक्षणाधिकारी, मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com