पुण्यातील "त्या' थराराची सोलापुरात पुनरावृत्ती ! आठ वाहनांना धडकून कंटेनरने घेतला तिघांचा बळी

तात्या लांडगे 
Saturday, 16 January 2021

काही वर्षांपूर्वी पुण्यात एसटी बसच्या अपघातात आठ ते दहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संतोष माने (काटी सावरगाव, ता. बार्शी) याने केलेल्या अपघाताची आठवण पोलिसांना झाली. त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा या ट्रक चालकावरही दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर : हैदराबाद- सोलापूर महामार्गावर संशयित आरोपी पी. के. पांडे याने आपल्या ताब्यातील कंटेनर हयगयीने व अतिवेगाने चालवून 13 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासात त्याने तब्बल आठ वाहनांना धडक दिली. त्यात चार दुचाकी, एक एसटी बस आणि दोन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दारू पिऊन गाडी चालवून निष्काळजीपणाने अपघातात तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालक पी. के. पांडे याच्याविरुद्ध भादंवि कलम 304(2), 337, 338, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, त्याच्या रक्ताचे नमुने तपासले असून, तो दारू पिऊन वाहन चालवत होता, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी पुण्यात एसटी बसच्या अपघातात आठ ते दहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संतोष माने (कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) याने केलेल्या अपघाताची आठवण पोलिसांना झाली. त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा या ट्रक चालकावरही दाखल करण्यात आला आहे. 

आरिफ बाबुमियॉं कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या सकलेन मोहम्मद काशीम कुरेशी व त्याचा मित्र रोहित बाळू चौगुले (दोघे रा. वळसंग, ता. द. सोलापूर) हे दोघे मोटारसायकल (क्र. एमएच - 13 डीएल 7862) यास जोरात धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला. 

पॉवरग्रीड लिंबी चिंचोळी येथे त्याचे जीपला (क्र. एमएच 13 - एसी 8190) जोरात धडक देऊन तसेच वेगाने कंटेनर चालवून तो तोगराळी गावच्या ब्रीजवर अक्कलकोट ते सोलापूर जाणाऱ्या रस्त्यावर अपघात केला. एमएच 12 क्‍यूजी 4339 या कारला पाठीमागून जोरात धडक देऊन तसेच पुढे जाऊन कुंभारी पुलावर सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या लोकांना उडवले. एसटी बस (एमएच- 14 बीटी- 2721) या गाडीच्या चालक साईडच्या बाजूस धडक दिल्याने त्याचा पत्रा कापत जाऊन कंटेनर कुंभारी गावात घुसला. पुढे मोटारसायकल (क्र. एमएच 13 सीवाय 5763) यास धडक दिल्याने चालक अमित सुभाष छपेकर हा जखमी झाला व त्याच्या पाठीमागे बसलेले त्याचे वडील सुभाष छपेकर हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. पुढे दुचाकीवरून (क्र. एमएच 13 सीई 6607) कंटेनर घालून त्याचे नुकसान केले. पुढे तो कंटेनर कुंभारी गावातील दगडी वेशीत घातला. त्यात दगडी वेस तुटून कंटेनर त्यात अडकून वेशीचे व कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

तिघांच्या मृत्यूस तो कंटेनर चालक कारणीभूत ठरला आहे, असेही फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले हे करीत आहेत. 

लोकांकडून कंटेनर चालकास बेदम मारहाण 
आठ वाहनांना धडक देऊन तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला कंटेनर कुंभारी गावाच्या वेशीत शिरला. या अपघातानंतर लोकांनी कंटेनर चालक पी. के. पांडे यास पकडले. त्याला उपस्थित लोकांनी रागाच्या भरात बेदम बदडले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती सुधारल्यावर त्याला अटक केली जाणार आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Walsang the container driver hit eight vehicles and due to this accident three persons died