प्रभाग कोरोनामुक्‍तीसाठी नगरसेवकांची धडपड ! रेड झोनमधील 21 नंबर प्रभागात दोन दिवसांत एकही रुग्ण नाही

तात्या लांडगे
Thursday, 19 November 2020

प्रभागासंबंधी ठळक बाबी...

 • आतापर्यंत 543 कोरोना पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 489 रुग्ण झाले बरे
 • प्रभागातील 29 रुग्ण ठरले कोरोनाचे बळी
 • सद्यस्थितीत 25 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील कोरोना होटगी रोड, आसरा परिसरापर्यंत पोहचला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेत सुरवातीला जनजागृतीवर भर दिला. मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकारक गोळ्यांचेही वाटप केले. सर्वरोग निदान शिबिरांच्या माध्यमातून संशयितांवर तत्काळ उपचार केले. त्यामुळे प्रभाग 21 मध्ये मागील दोन दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही.

प्रभागासंबंधी ठळक बाबी...

 • आतापर्यंत 543 कोरोना पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 489 रुग्ण झाले बरे
 • प्रभागातील 29 रुग्ण ठरले कोरोनाचे बळी
 • सद्यस्थितीत 25 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

प्रभागातील मल्लिकार्जुन नगर, ब्रह्मदेव नगर, सुरवसे मित्र नगर, आसरा सोसायटी, लोकमान्य नगर, आसरा परिसर, सिध्देश्‍वर नगर भाग एक ते पाच, सहारा नगर, आंबेडकर नगर, आनंद नगर व साईनाथ नगर, याठिकाणी बहुतांश रुग्ण आढळले. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक तौफिक शेख, अजहर हुंडेकरी, नगरसेविका वाहिदाबी शेख, तस्लीम शेख यांनी जनजागृती व आरोग्य शिबिरांवर भर दिला. ताज सोशल ग्रूपच्या माध्यमातून साईनाथ नगरात मोफत सर्वरोग निदान शिबिर पार पडले. त्यानंतर रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेत अनेकांच्या मनातील संशय, भिती दूर केली. त्यासाठी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, पोलिस प्रशासनाकडूनही सहकार्य मिळाले. शासनाकडून मिळालेल्या धान्यासोबतच नगरसेवकांनीही गरजूंना धान्य वाटप करीत संकट काळात घराबाहेर पडू दिले नाही. सध्या हा प्रभाग रेड झोनमध्ये असला तरी या प्रभागात दोन दिवसांत रुग्ण सापडला नसल्याने आता प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी नियमांचे पालन तंतोतंत केल्यास निश्‍चितपणे हा प्रभाग लवकरच कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वास नगरसेवकांनी व्यक्‍त केला.

 

  जनजागृतीसाठी काढली प्रबोधन रॅली
  कोरोनाचा प्रभागात वाढलेला प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जनजागृतीसाठी रॅली काढली. संशयितांसाठी रॅपिड ऍन्टीजेन टेस्टची मोहीम राबविली. मास्क, सॅनिटायझर, धान्य वाटप केले. त्यासाठी ताज सोशल ग्रूपची मोठी मदत झाली. को- मॉर्बिड रुग्णांसाठी नई जिंदगी परिसरात महापालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली. 
  - तस्लीम शेख, नगरसेविका

  ताज सोशल ग्रूपची सामाजिक बांधिलकी
  प्रभागातील सर्व नागरिकांपर्यंत कोरोनाचे संकट पोहचू नये म्हणून चारही नगरसेवकांनी एकत्रितपणे जनजागृतीवर भर दिला. धान्य वाटप, गरजूंना जेवण दिले तर मास्क, सॅनिटायझरसह रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविणाऱ्या गोळ्यांचेही वाटप केले. ठराविक नगरांतच आता कोरोनाचे रुग्ण असून काही नगरांमधील प्रादुर्भाव कमी झाला आहे.
  - वाहिदाबी शेख, नगरसेविका


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Ward 21 in the red zone has no patients in two days