ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षण मंगळवारी होणार अंतिम 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या टप्प्यात होत असल्याने जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जातो

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीला अंतिम मान्यता देण्याबाबत परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून 27 ऑक्‍टोबर रोजी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. 

कोरोना महामारीमुळे थांबलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम आता पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने गावातील राजकारणाला सुरुवात होणार आहे. जुलै ते डिसेंबर दरम्यान ज्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची व आरक्षण सोडतीचे प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडून तपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. त्यांच्या प्रभाग रचनेला व आरक्षण सोडतीला अंतिम मान्यता मंगळवारी दिली जाणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 28 ग्रामपंचायतींपैकी 658 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत पूर्ण होत आहे. जुलैमध्ये 4, ऑगस्टमध्ये 123 आणि ऑक्‍टोबरमध्ये सहा अशा 133 ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये 519 व डिसेंबर मध्ये सहा ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका या टप्प्यात होत असल्याने जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जातो. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ward composition of Gram Panchayats, reservation will be finalized on Tuesday