
महापालिकेच्या पत्रानुसार...
सोलापूर : शहरातील नागरिकांना पावसाळा असो की उन्हाळ्यातही चार ते सहा दिवसाआड पाणी मिळत असून हा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. वर्षभराची पाणीपट्टी भरुनही वारंवारच्या अडथळ्यांमुळे नागरिकांना महापालिकेने ठरविल्याप्रमाणेही पाणी मिळू शकत नाही. आता टाकळी येथील पंप हाऊसवरुन पाणी उपसून सोरेगाव येथे आणले जात आहे. त्यासाठी 60 तासांचा वेळ लागणार असल्याने पुढील आठवडाभर सोलापुरकरांना पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळणार आहे. मात्र, हद्दवाढ भागात यापूर्वी पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळत होते. आता या अडथळ्यामुळे त्यांना सात ते आठ दिवसाआड पाणी मिळणार आहे.
महापालिकेच्या पत्रानुसार...
शहरास पाणीपुरवठा करणारी टाकळी- सोरेगाव दरम्यानची पाईपलाईन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात येत होती. महामार्गाचे काम आटोपून त्याठिकाणी नवी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या कामामुळे 4 ते 6 डिसेंबरपर्यंत पाईपलाईन बंदच ठेवण्यात आली होती. आता पाईपलाईन जोडणी पूर्ण झाल्याने टाकळी पंप हाऊसवरुन सोरेगाव येथे पाणी आणले जात आहे. त्यासाठी 60 तासाचा वेळ लागणार असल्याने शहराचा पाणी पुरवठा आठवडाभर विस्कळीत होईल, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुकरांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची पाणी पुरवठा दोन दिवसाआड करण्याच्या निमित्ताने दीड महिन्यांपूर्वी बैठक पार पडली. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्याच्या नियोजनाची जबाबदारी सोपवून अहवाल देण्याचे आदेश महापौर व आयुक्तांनी दिले. मात्र, त्यानुसार काहीच काम झाले नसून अंमलबजावणी तर दूरच राहिली आहे.