esakal | उन्हाळ्यात फिसरे ग्रामस्थांची भागणार तहान ! गावात प्रथमच पोचले दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी 

बोलून बातमी शोधा

Fisare_Water}

24 फेब्रुवारीपासून फिसरे या गावाला पाणी सुरू झाले आहे. तेथील ढवळे तलावात पाणी पोचले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात फिसरे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

उन्हाळ्यात फिसरे ग्रामस्थांची भागणार तहान ! गावात प्रथमच पोचले दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी 
sakal_logo
By
दस्तगीर मुजावर

पांडे (सोलापूर) : करमाळा तालुक्‍याची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र 24 गावांत येते. परंतु कॅनॉलची व उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे योजना कार्यान्वित होऊन तीन वर्षे झाली, तरीही लाभक्षेत्रांमधील हिसरे, अर्जुननगर आणि फिसरे या गावांना दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी अद्याप मिळालेच नव्हते. गतवर्षी जानेवारी महिन्यात अर्जुननगर व फिसरे या गावांना आमदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रथमच पाणी मिळाले होते. 

यावर्षी फिसरे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आल्यानंतर आमदार संजय शिंदे यांची भेट घेऊन "विकासाच्या मुद्द्यावर आम्ही तुमचे नेतृत्व मान्य करतो. आमच्या गावाला दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी द्या' अशी आग्रही मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत त्याची वचनपूर्ती आमदार संजय शिंदे यांनी केली असून, 24 फेब्रुवारीपासून फिसरे या गावाला पाणी सुरू झाले आहे. तेथील ढवळे तलावात पाणी पोचले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात फिसरे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

मुख्य कॅनॉलपासून फिसरे गावातील ढवळे तलावापर्यंत लोकवर्गणीमधून गावकरी मंडळींनी चारी खोदायचे काम पूर्ण केले. हा तलाव 100 टक्के भरण्याचे नियोजन आहे. आमदार संजय शिंदे यांच्या कामावर तेथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या पाण्याचे पूजन ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच लता नेटके, ग्रामपंचायत सदस्य वैशाली ठावरे, राधा अवताडे, हनुमंत रोकडे, प्रशांत नेटके, धनश्री काटे यांच्यासह बाळू अवताडे, नारायण नेटके, महादेव आवताडे, संदीप नेटके, सुमीत अवताडे, नारायण नेटके आदी ग्रामस्थांनी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल