अधिकाऱ्यांशी चर्चा करू; सोलापूरच्या लॉकडाउनचा निर्णय उद्या जाहीर करू 

प्रमोद बोडके
बुधवार, 24 जून 2020

उद्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक 
उद्या (बुधवार) पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर पोलिस, महापालिका, जिल्हाधिकारी यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून लॉकडाऊन बाबतचा निर्णय जाहीर करण्याची दाट शक्‍यता आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या व कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणायचा कसा? असाच प्रश्न सर्वसामान्यांसह जिल्हा प्रशासनालाही पडला आहे. 15 दिवसांसाठी सोलापूर शहर व परिसरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तयार केला आहे. या प्रस्तावाबाबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्‍यक आहे ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. पंधरा दिवसाच्या कडक लॉकडाऊन बाबत उद्या (गुरुवारी) मी सोलापुरात आल्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. 
दरम्यान, पालकमंत्री भरणे उद्या (गुरुवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी 11 वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता ते सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या प्रकल्पाबाबतही ते आढावा बैठक घेणार आहेत. पालकमंत्री भरणे यांच्या उद्याच्या दौऱ्यात सोलापुरातील लॉकडाऊन बाबत ठोस निर्णय व तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या सोलापुरात दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन पुन: प्रारंभच्या माध्यमातून सवलती दिल्यानंतर अवघ्या 18 ते 20 दिवसांमध्ये सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची व मृतांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याने हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याची चाचपणी सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. या उपाययोजनाचा प्रमुख भाग म्हणजे 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊन हा पर्याय समोर आला आहे. सोलापूर शहरात करण्यात येणारे संभाव्य लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याशी याबाबतची चर्चा करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will discuss with the authorities we will announce the decision of Solapur lockdown tomorrow