लग्नसराईचा सजू लागला साज! मार्चमध्ये नाही एकही मुहूर्त; एप्रिलपासून उडणार लग्नाचा बार

राजाराम माने 
Sunday, 24 January 2021

शासकीय नियम स्थितीत झाल्यानंतर लग्न समारंभ पूर्वीसारखेच रंगात येऊ लागले आहेत 

केत्तूर (सोलापूर) : तुलशी विवाहानंतर लग्नसराईचा मोसम सुरू झाला असून, लग्नसराई निमित्त बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वकाही थांबले होते, त्याला लग्नसमारंभही अपवाद होते. त्यामुळे लग्नाला 'ब्रेक' लागला होता. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेल्या मंडप, डेकोरेशन, डेकोरेटर्स, लॉन, वाजंत्री, डॉल्बी, फुलवाले आदींच्या व्यवसायावर संकट आले होते. शासकीय नियम स्थितीत झाल्यानंतर लग्न समारंभ पूर्वीसारखेच रंगात येऊ लागले आहेत.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

आगामी लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल, बॅंड बाजा, घोडा, हार-फुलवाले हे सर्व व्यावसायिक आता सज्ज झाले असून त्यांचे तारखा बुकिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुळे गतवर्षी रखडलेली लग्नही आता होणार असल्याने नववधू-वरांची हौस-मौज पूर्ण होणार असल्याने तेही खुशीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जानेवारी 21 मध्ये 3, 5, 6, 7, 8, 9, 10 या शुभमुहूर्तावर लग्न समारंभ पार पडले तर फेब्रुवारीमध्ये 15, 16 या तारखेनंतर शुक्राचा अस्त असल्याने लग्नमुहूर्त नाहीत ते थेट एप्रिल महिन्यात 22, 24, 25, 26, 28, 30, 31, मे महिन्यात 1, 2, 3, 4, 5, 8, 13, 20, 21, 22, 24, 26, 28, 30, 31 व जून महिन्यात 4, 6, 16, 20, 26, 27 तर जुलै महिन्यात 1, 2, 3, 13 असे लग्नासाठी शुभमुहूर्त आहेत. 

गतवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे गतवर्षी रखडलेली लग्न आता जोराने सुरू होत आहेत. यावर्षी लग्नसराईचा हंगाम जोरात आहे. लग्न समारंभ पार पाडण्यासाठी नववधू-वरांच्या घरात हालचाली वाढल्या आहेत. लग्न तारखा बुकिंग सुरू आहेत. हा हंगाम चांगला जाण्याचे संकेत मिळत आहेत. 
- राजेंद्र मोरे, जयहरी केटरर्स, टाकळी, ता. करमाळा 

कोरोना महामारीच्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका ब्रास बॅंडला बसला. त्यावेळी झालेले लग्नसमारंभ मोजक्‍यांच्या उपस्थितीत वाजंत्रीशिवाय, कोणताही गाजावाजा न करता पार पडले, त्यामुळे वादकांची उपासमारही झाली. परंतु यावर्षी दिवस चांगले जाण्याचे संकेत आहेत. परंतु पूर्वीसारखा दर मिळत नाही. तसेच बॅंडपेक्षा तरुणाईचा ओढा डॉल्बी सिस्टीमकडे वाढला आहे. 
- मस्तानभाई कुरेशी, दोस्ती बॅंड, करमाळा 

दारासमोर लग्न करण्यापेक्षा मंगल कार्यालयामध्ये लग्न करण्यालाच सध्या पसंती दिली जात असली तरी, यावर्षी लग्नसराईचा हंगाम चांगला असल्याने सर्व तारखा बुकिंग झाल्या आहेत. गतवर्षीची कसर यावर्षी निश्‍चितच निघण्याची शक्‍यता आहे. 
- शंकर गुंजाळ, मंडप कॉन्ट्रॅक्‍टर, भगतवाडी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wedding season has started after the Tulsi wedding