ऊसाची गाडी कारखान्यावर आल्यावर आगोदर वजन, मगच नंबर 

प्रमोद बोडके
Thursday, 15 October 2020

वेविंग मशिनची कारखान्यांना करा सक्ती 
साखर कारखाने हे भरलेल्या वाहनांची पावती काढत नाहीत. वाहन रिकामे होऊन आलेनंतर वजावट करून पावती वाहन चालकाकडे देतात. वाहन काट्यावर उभारल्या नंतर वजन त्यांनी स्वतः विकसित केलेल्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे संगणकावर घेतात. त्यामध्ये वजनात फेरफार करण्याला पर्याय उपलब्ध असतो. तसे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. प्रत्येक कारखान्याला ऑटो वेवींन्ग मशीन बसविण्याची सक्ती करावी अशी प्रमुख मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळित हंगामाला आता सुरुवात होऊ लागली आहे. यंदाच्या हंगामापासून ऊसाच्या वजनाबाबत काही बदल करावेत अशी मागणी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. ऊस घेऊन आलेले वाहन कारखान्यावर आल्यानंतर तत्काळ ऊसाचे वजन करावे. त्यानंतरच ऊस गाळपासाठी वाहनाचा नंबर लावावा अशी प्रमुख मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, वजनमापे विभाग व साखर सहसंचालक कार्यालयाला देण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, इक्कबाल मूजावर, सचिन मस्के, सचिन राऊत उपस्थित होते. वजनाची पावती ऑटो जनरेटेड स्वरुपात वेईन्ग मशीनवरील पावती वाहन धारकाकडे (मालकाकडे) देण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्याला वजन काट्यापर्यंत येण्यास मज्जाव केला जातो. वजन काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी.

वजन काट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी (तसा फलक लावावा), शेतकऱ्याला वजनाबाबत तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करावी? त्याची माहिती दर्शविणारा फलक काट्याशेजारी अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरसह लावावा. बाहेरच्या काट्यावर शेतकऱ्याने वजनाच्या खात्रीसाठी वजन केल्यास कारखाना असे वाहन नाकारतो. त्याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात. ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे हे इलेक्‍ट्रॉनिक व ऑटो जनरेटेड असावेत, वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप असू नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weigh the sugarcane cart first when it arrives at the factory, then the number