स्वागताला रांगोळी, सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर ः विद्यार्थ्यांचे केले फूल देउन स्वागत;

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

सुरक्षेच्या सोबत सर्वच शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तयारीचे मोठे नियोजन करुन अध्यापनाची सुरवात केली. स्वागतासाठी गुलाब आणि रांगोळ्यांच्या पायघड्याही घातल्या होती. एवढे करुनही विद्यार्थी, शिक्षक, पालक कोरोना संसर्गाच्या भीतीत असल्याचे पावलोपावली जाणवत होते. 

सोलापूरः  कोरोनाच्या धास्तीने निम्म्या वर्षानंतर विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या. बाकावरील धूळ झटकली गेली. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. घंटा वाजली. कोरोना चाचणीत निगेटिव्ह आलेले शिक्षक ऑक्‍सिमिटर, थर्मल गन घेऊन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. हे दृष्य शहरातील विविध शाळांमध्ये पाहण्यास मिळाले. सुरक्षेच्या सोबत सर्वच शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तयारीचे मोठे नियोजन करुन अध्यापनाची सुरवात केली. स्वागतासाठी गुलाब आणि रांगोळ्यांच्या पायघड्याही घातल्या होती. एवढे करुनही विद्यार्थी, शिक्षक, पालक कोरोना संसर्गाच्या भीतीत असल्याचे पावलोपावली जाणवत होते. 
राज्य शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे खबरदारी घेऊन शहर-जिल्ह्यातील पाचवी ते आठवी वर्ग बुधवारी सुरू झाले. वर्गखोल्यांची स्वच्छता करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे फूल देउन स्वागत केले. मात्र अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प दिसून आली. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संक्रमणाची भीती अद्यापदेखील दिसून येत आहे. सर्वच शाळांकडून पाल्यांना शाळेत पाठविण्याअगोदर संमतीपत्र भरून घेतली गेली. 
शहरातील पी. एस. इंग्लिश मिडियम टेक्‍निकल हायस्कूल, उमाबाई श्राविका हायस्कूल, दमाणी हायस्कूल, जैन गुरुकुल प्रशाला आदी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज होत्या. शाळेत रांगोळी काढलेली होती. सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना लाडू देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्‍सिजन पातळी, पल्स रेट पाहून वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे पालकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आजपासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली. मात्र शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होउ नये, यासाठी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलविण्यात येणार असल्याचे शाळेतील मुख्याध्यापकांनी सांगितले. त्यातील पहिली बॅच आज उपस्थित राहिली. दुसऱ्या बॅचला गुरुवारी (ता. 28 जानेवारी) रोजी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर येथील पी. एस. इंग्लिश मिडियम टेक्‍निकल हायस्कूल, उमाबाई श्राविका हायस्कूल, जैन गुरुकूल प्रशाला, दमाणी हायस्कूलमधील शिक्षकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने शाळा सुरू करण्यात आले आहेत. 

सेवासदन कन्या प्रशालाही शहरातील नामांकित शाळा असून, पाचवी ते आठवी वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थिनींना मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर आदींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी फुल देऊन स्वागत करण्यात आले. 

शहरातील सिध्देश्‍वर प्रशालेत आज पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. सॅनिटायझर, ऑक्‍सिमिटर व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. सकाळी साडेअकरा ते तीन या कालावधीत शाळा भरवण्यात आली. तसेच मधील सुटी रद्द करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे संकलित करण्यात आली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के एवढी होती. 

हरिभाई देवकरण प्रशालेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तासिकादेखील सुरु झाल्या आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षांचे गांभिर्य लक्षात घेऊन सराव व इतर प्रकारच्या चाचण्यांना प्राधान्य दिले गेले आहे. तसेच विद्यार्थ्यांची विज्ञान प्रात्यक्षिके परीक्षेच्या आधी पूर्ण केली जात आहेत. पाचवी, सहावी व नववी वर्गासाठी आठवड्यातून तीन दिवस शाळा होतील. सातवी, आठवी व दहावीची शाळा तीन दिवस भरणार आहे. 

स्वच्छतेला महत्व 
कोरोनाची खबरदारी घेत सर्व वर्गखोल्या निर्जतुकीकरण करुन स्वच्छ करण्यात आल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांसोबत संमतीपत्र देउन शाळेत पाठवावे. 
-सुकुमार मोहोळ, मुख्याध्यापक, चतुराबाई श्राविका हायस्कूल, सोलापूर 

संमतीपत्रांचे संकलन 
प्रत्येक विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र घेण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका बाकावर एक विद्यार्थी बसतील, अशी त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारी घेउन एक दिवसाड विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे. 
-स्वाती कांबळे, मुख्याध्यापीका, पी. एस. इंग्लिश मिडीयम टेक्‍निकल हायस्कूल, सोलापूर 

 

नियमांचे पालन 
 सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पालकांच्या अनुभूतीची आम्ही वाट बघत आहोत. पहिल्या दिवशी विद्यार्थी येतील, अशी अपेक्षा नाही. मात्र यामध्ये हळूहळू वाढ होईल. ज्या पालकांनी अनुमती दिली आहे. त्यांचे पाल्य शाळेत आलेले आहेत. उर्वरित पालकदेखील संमतीपत्र भरून येतील, अशी अपेक्षा आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. पालकांनी भीती न बाळगता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. 
-आशुतोष शहा, मुख्याध्यापक, जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome Rangoli, Safety Mask, Sanitizer: Welcome to the students with banana flowers;