या जिल्ह्यातील शिवसेना नेत्याने काय केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी ः सविस्तर वाचा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जिल्हा दूध संघाने द्यावीत शेतकऱ्यांची देणी 
सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची दुधाची बिले देणे बाकी आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून या संघाने शेतकऱ्यांना दूधाची बिले दिली नाहीत. ती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेना नेते. 

सोलापूर ः जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळ्या संकटात सापडला आहे. त्याला त्या संकटातून मुक्त करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा मातृभूमी शेतकरी व कामगार संघटनेचे संस्थापक लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

श्री. ठाकरे हे आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरीत येत आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर ठोंगे-पाटील यांनी श्री. ठाकरे यांना हे निवेदन दिले आहे. कृषी विभागाने हवामानाधारित फळपिक विमा योजनेचे निकष नुकतेच जाहीर केले आहेत. मात्र, ते निकष फळबागा असलेल्या विशेषतः डाळिंब बागा असलेल्या शेतकऱ्यांच्या मुळावर येणारे आहेत. या निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. तेव्हा ते निकष बदलण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करुन शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. ती लूट थांबविण्यात यावी. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही उसाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. ती रक्कम देऊन शेतकऱ्यांन आर्थिक दिलासा देण्यात यावा. पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. पीक विमा मंजूर होऊनही हे पैसे मिळत नाहीत अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून शेतीसाठी वीज जोडण्या मिळालेल्या नाहीत. अनेकदा मागणी करुनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खरीप हंगाम सुरु झालाआहे. या हंगामासाठी खरीप पीक कर्ज बॅंकांनी देणे आवश्‍यक आहे. पण, जिल्ह्यातील बॅंकांनी पिक वर्ज वाटपाकडे पाठ फिरवली असल्याचेही श्री. ठोंगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांशी संबंधित या सगळ्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did the Shiv Sena leader in this district do? Demand to the Chief Minister: Read in detail