वाचा...नूतन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कशाची खंत वाटते 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 मे 2020

सोलापूर जिल्हा कोरोनामुक्‍त करू 
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, आश्‍वासन यावेळी त्यांनी केले. तसेच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

अकलूज (सोलापूर) : करोनाने मागील तीन महिन्यांपासून उद्योगधंदे बंद आहेत. शेती व शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या जीवाशी प्रशासनाने खेळ मांडला आहे. खासगी डॉक्‍टरांना सुरक्षेची हमी नसल्याने त्यांनी आपले दवाखाने बंद केले आहेत. अशा अनंत अडचणीने जिल्ह्याला घेरलेले असताना प्रशासनाला जाब विचारणारा बाप माणूस नाही. आता तुम्हीच लक्ष घाला, अशी मागणी पत्रकार व कार्यकर्त्यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली. 

विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार मोहिते-पाटील यांनी मागील दोन दिवसांत सोलापूर शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तेव्हा कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी जिल्ह्यातील अडीअडचणीचा त्यांच्यासमोर पाढाच मांडला. ग्रीन झोनमध्ये असलेला सोलापूर जिल्हा काही दिवसातच रेड झोनमध्ये गेला. आज जिल्ह्यात 748 रुग्ण आहेत. त्यापैकी 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर सरासरीच्या जवळपास 10 टक्के असून तो अत्यंत धोकादायक आहे. सर्वोपचार रुग्णालयात करोना रुग्णांची हेळसांड, एकाच वॉर्डमध्ये कोविड रुग्ण आणि नॉन कोविड रुग्ण, स्वॅब तपासणीतील त्रुटी, अत्यल्प फिवर क्‍लिनिक सेंटर, खासगी रुग्णालयांची अनास्था, पालकमंत्र्याचे दुर्लक्ष, शेतीमालाला दर नाही, ट्रासफॉर्मर नसल्याने अडचण, बंद उद्योगधंदे, खासगी डॉक्‍टरांना संरक्षण व त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याची गरज. खासगी दवाखान्यात स्वॅब घेण्याची सोय झाली तर करोना रुग्ण तपासणीला वेग येईल, अशी चर्चा झाली. परंतु, सोलापूरकरांचे हे प्रश्‍न समजून घेणारा व त्यांना योग्य दिशा देणारा बाप माणूसच नाही, आज तुम्ही स्वतः संवाद साधून प्रश्‍न समजून घेतले. आता तुम्हीच पुढाकार घेऊन शासनाकडून प्रश्‍नांची सोडवणूक करावी व जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. 
राजू सुपाते, सूर्यकांत भिसे, रवी मोहिते, प्रवीण डोंगरे, किरण पवार, बबलू इनामदार, सारंग तरे, सोमनाथ होसाळ, नारायण माशाळकर, दिनेश जाधव, कल्पेश जव्हेरी, युसूफ शेख, प्रताप कांचन यांच्यासह पत्रकार बंधूंनी चर्चेत सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What does the MLA Ranjitsinh Mohite Patil feel