जाणून घ्या! शरद पवारांनी उल्लेख केलेले घेरडी प्रकरण काय आहे

अशोक मुरुमकर
सोमवार, 6 एप्रिल 2020

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या (कोविड- १९) संदर्भात खासदार शरद पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी शरद पवार यांच्याकडे व्यथा मांडली. त्यात दिल्लीतील प्रकरणावर बोलताना दिल्लीत पोलिसांनी तत्पर्ता दाखवणे आवश्‍यक होते, असे मत व्यक्त केले.

सोलापूर : घेरडी (सांगोला) येथे बैल आणि घोडा यांची शर्यत घेतली. हा सोहळा करण्याची खरच गरजच नव्हती. पण लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, याचा आनंद आहेच. पण तशीच तत्पर्ता दिल्लीत दाखवली असती, तर कदाचित आज जे घडतय ते पहाण्याची वेळ आली नसती, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. 
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या (कोविड- १९) संदर्भात खासदार शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी शरद पवार यांच्याकडे व्यथा मांडली. त्यात दिल्लीतील प्रकरणावर बोलताना दिल्लीत पोलिसांनी तत्पर्ता दाखवणे आवश्‍यक होते, असे मत व्यक्त केले. दिल्लीत खबरदारी घेतली असती तर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात ही अशा कार्यक्रमांना परवानगी मागण्यात आली होती. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली नाही. पंढरपूर येथील स्वप्नील गावडे यांनीही शरद पवार यांना प्रश्‍न विचारला होता. 

काय आहे घरेडीतील प्रकरण...
सांगोला तालुक्यातील ‘सकाळ’चे पत्रकार दत्तात्रय खंडागळे म्हणाले, घरेडी येथे ३१ मार्चला बैल- घोडा शर्यत झाली होती. त्यात संयोजकांसह १० वाहकांवर गुन्हा दाखल झाला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नागरिकांमध्ये माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिबंध असताना व सध्या राज्यात संचारबंदी असतानाही बैल व घोडा जोडीच्या गाड्यांच्या शर्यत घरेडी येथे घेण्यात आली होती. त्याबद्दल संयोजक तसेच बैल व घोडा जोडी गाड्यांचे 10 अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. संचारबंदीच्या काळात संयोजक संतोष नामदेव खांडेकर (रा. घेरडी ता. सांगोला) व इतर अज्ञात संयोजकांनी दिनांक 31 मार्चला सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये बैल व घोडा जोडीच्या गाड्यांच्या शर्यतीचे बक्षीस तत्वावर आयोजन करण्यात आले होते. संयोजकांनी गणपती पट्टा येथे अंदाजे 6 किलोमीटरवर पळून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येणे असे शर्यत लावली होती. संयोजकांनी संगनमताने घेरडी (ता. सांगोला) येथे शर्यतीचे आयोजन करुन बैल व घोड्याला त्रास होईल असे चालकांनी कृती केले आहे. तसेच सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम 144 लागू असतानादेखील पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन या शर्यतीचे आयोजन केले, असा आरोप करण्यात आला. यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दिल्लीतील काय आहे प्रकरण
दिल्लीमध्ये तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीतील निजामुद्दीन इथं मुस्लिम संस्था तबलीगी जमातचं मुख्यालय आहे. येथे मार्चमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. देशात लॉकडाऊन असतानाही इथे मोठ्या संख्येनं लोक एकत्र राहात असल्यामुळे अनेकांमध्ये आजारपणाची लक्षणं दिसून आली. देशातील कानाकोपऱ्यातून येथे लोक गेले होते. ते पुन्हा आपापल्या घरी परतल्याने कोरोनाची लगण असलेल्यांची संख्या वाढण्याचा धोका आहे. सोलापूर जिल्ह्यातील काहीजण दिल्ली येथे गेल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्यातील तपासणी केलेल्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Sharad Pawar said in Facebook Live