#RepublicDay2020 : दिलीप वळसे- पाटील यांनी सोलापूरकारांना काय ग्वाही दिली वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘सोलापूर जिल्हा शेती आणि शेतीवर आधारित उद्योगावर आधारित आहे. त्यामुळे प्रामुख्याने शेतीशी निगडीत प्रश्न सोडविण्यावर भर राहील, जलसिंचन, कृषी उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य असेल. पंढरपूर, अक्कलकोट आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्वर या तीर्थक्षेत्रांचा नियोजनबध्द विकास होईल, यासाठी अधिकचा निधी मागण्यासाठी प्रयत्नशील असू.’

सोलापूर : सोलापुरातील विविध व्यवसाय व उद्योगांना चालना मिळण्यासाठी रस्त्यांचा विकास गतीने करण्यावर भर असल्याचे पालकमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलिस मुख्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘सोलापूर जिल्हा शेती आणि शेतीवर आधारित उद्योगावर आधारित आहे. त्यामुळे प्रामुख्याने शेतीशी निगडीत प्रश्न सोडविण्यावर भर राहील, जलसिंचन, कृषी उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य असेल. पंढरपूर, अक्कलकोट आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्वर या तीर्थक्षेत्रांचा नियोजनबध्द विकास होईल, यासाठी अधिकचा निधी मागण्यासाठी प्रयत्नशील असू.’ सोलापुरातील विविध व्यवसाय आणि उद्येागांना चालना मिळण्यासाठी रस्त्यांचा विकास गतीने करण्यावर भर आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग विभाग विविध रस्ते विकासाच्या योजनांमधून सोलापूर आणि महत्वाच्या शहरांशी संपर्क वाढेल यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही पालकमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले. शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामूळे नागरिकांना विविध सेवा सुविधा गतीने मिळतील अशी अपेक्षा आहे. सात-बारा संगणकीकरण, गावांची ड्रेाणद्वारे मोजणी व मालमत्ता पत्रिकांचे संगणकीकरण यांचा यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषदेने घरकुल उभारणीत आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व विविध घटक यांचे सहकार्य अपेक्षित आहे. सोलापूरच्या विकासात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी पालकमंत्री वळसे पाटील यांनी घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, रेल्वे पोलिस दल, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या पथकाने शानदार संचलनाद्वारे पालकमंत्री श्री. वळसे- पाटील यांना मानवंदना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Valase Patil provided to the citizens of Solapur