उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल..!

उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल..!

सोलापूर : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना आणि डॉ. मेतन फाउंडेशन यांच्यातर्फे ऑलिंपिक दिनी राज्यस्तरीय परिसंवाद झूम ऍपद्वारे आयोजित करण्यात आला. यावेळी राज्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले. या राज्यस्तरीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर सहभागी झाले होते. 

जागतिक ऑलिंपिक दिन साजरा 
जागतिक ऑलिंपिक दिन साजरा कारण्यानिमित्त राज्यस्तरीय परिसंवाद घेण्यात आला. परिसंवादात झुबीन अमारिया यांनी सर्वांचे स्वागत केले. जलतरण असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेबाबत थोडक्‍यात माहिती दिली. त्यानंतर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी डॉ. मेतन फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. या सेमिनारमध्ये महाराष्ट्र राज्यातील खेळाडू, पालक आणि राज्यातील 200पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 

खेळाडूंना फिटनेसचे महत्त्व 
श्री. शिरगावकर यांनी "ऑलिंपिक स्पर्धेचा इतिहास, उद्देश आणि वाटचाल यावर मार्गदर्शन केले. त्यांनी खेळाडूंना फिटनेसचे महत्त्व, त्यासाठी उपयुक्त माहिती दिली. खेळाडूंना उत्तम यश मिळण्यासाठी काही टिप्स दिल्या. 

युवक खेळाकडे व्यवसाय म्हणून पाहतात 
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांनी "भारतीय खेळाडूंचे ऑलिंपिक स्पर्धेसाठी भविष्य'या विषयावर बोलताना भारतीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्यातील फरक सांगितला. काही खेळांव्यतिरिक्त खेळाडूंसाठी देशस्तरावर शिबिर कमी प्रमाणात घेतले जात होते. परंतु, 2005-06 पासून त्यात हळूहळू बदल होऊन प्रत्येक खेळाला महत्त्व प्राप्त होत आहे. भारतीय सरकारने मागील काही वर्षांत सर्व खेळाला प्राधान्य दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाडूंना यश मिळत आहे. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूंचे साहित्य निर्माण करणाऱ्या कारखान्यांची उभारणी करणे गरजेचे आहे. सध्या युवक खेळाकडे एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत, ही आनंददायी बाब आहे. 

खेळाडूंनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे 
क्रीडा सहसंचालक व युवा सेवा संचालक डॉ. जयप्रकाश दुबळे "कोविड -19चा जलतरणावर झालेला परिणाम'बाबत म्हणाले, कोरोनाने सर्व स्पर्धा रद्द झाल्या आहेत. या परिस्थितीत क्रीडा क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत इंडियन ऑलिंपिक असोसिएशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून खेळाडूंच्या फिटनेस आणि आरोग्यासाठी वेबसेमिनार घेण्यात आले. प्रत्येक खेळाडूने याबाबत सतर्क राहून शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे, असे आवाहन त्यांनी केले. 

ध्येय ठेवून वाटचाल केल्यास उत्तम 
अर्जुन विजेते वीरधवल खाडे यांनी वेबसेमिनार माध्यमातून ऑलिंपिक दिन साजरा केल्याने आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांनी स्वतःच्या यशाची गाथा सांगत प्रत्येक स्पर्धेनंतर पुढच्या स्पर्धेत अजून एक पदक कसे मिळेल हा ध्यास लागायचा, त्यासाठी फिटनेस आणि उच्च ध्येय समोर ठेवून स्पर्धेची तयारी करत होतो. प्रत्येक खेळाडूने ध्येय ठेवून वाटचाल केल्यास उत्तम खेळाडू बनू शकतो, असे मत व्यक्‍त केले. 

डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमदरम्यान चार वक्‍त्यांनी सोलापूरचे झुबीन अमारिया यांचे कौतुक केले. अनिता तलवलीकर यांनी आभार मानले. यात किशोर शेट्टी, राजू कोळी, संभाजी भोसले, प्रा. सुरेशबाबू मंकणी आणि डॉ. मेतन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com