व्हॉट्‌सऍप मेसेजेसमुळे मोबाईल हॅंग होतोय? आता नव्या फीचरमुळे मेसेजेस सात दिवसांत क्‍लिअर ! 

Whatsapp
Whatsapp

माढा (सोलापूर) : व्हॉट्‌सऍपमधील मेसेज सात दिवसांत आपोआप न दिसण्याच्या डिसऍपिअरिंग मेसेजेस या नव्या फीचरचा वापर व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांनी सुरू केला असून, यामुळे क्‍लिअर चॅटच्या कटकटीतून व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांना मुक्तता मिळाली आहे. 

व्हॉट्‌सऍपमध्ये मागील काही दिवसांपासून नवीन फीचर सुरू झाले आहे. या नव्या सुविधेमुळे व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील अथवा व्यक्तिगत मेसेज सात दिवसांत आपोआप न दिसण्याची सुविधा व्हॉट्‌सऍपने उपलब्ध करून दिली आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये व्हॉट्‌सऍपचे मोठ्या प्रमाणावर ग्रुप तयार झालेत. शिवाय व्यक्तिगत मेसेज लोक मोठ्या प्रमाणावर पाठवू लागले. त्यामुळे मेसेजेसची संख्या वाढल्याने मोबाईल हॅंग होण्याचा त्रास व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांना होत होता. यामुळे मोबाईलची मेमरीही फुल्ल होत होती. यासाठी व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांना आपल्या ग्रुपमधील अथवा व्यक्तिगत मेसेज वारंवार क्‍लिअर चॅटमध्ये जाऊन काढून टाकावे लागत होते. 

समाज माध्यमांमध्ये सध्या व्हॉट्‌सऍपचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हॉट्‌सऍपने विविध ग्रुपमधील अथवा व्यक्तिगत मेसेज सात दिवसांमध्ये आपोआप न दिसण्याची सुविधा सध्या सुरू केली आहे. याचा व्हॉट्‌सऍप वापरकर्ते व विविध ग्रुपचे ऍडमिन मोठ्या प्रमाणावर उपयोग करू लागले आहेत. 
व्हॉट्‌सऍपचे मेसेज सात दिवसांत न दिसण्याची सुविधा बाय डिफॉल्ट ऑफ असते. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांना आपले व्हॉट्‌सऍप सुरवातीला अपडेट करावे लागते. नंतर व्हॉट्‌सऍप चॅटमध्ये जाऊन व्यक्तीच्या नावावर क्‍लिक केल्यानंतर डिसऍपिअरिंग मेसेजेस ऑन केल्यास संबंधित व्यक्तीचे व्हॉट्‌सऍप मेसेजेस, व्हिडिओ अथवा इतर चॅट्‌स सात दिवसांत आपोआप दिसेनासे होतील. 

व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये ही सुविधा ग्रुप ऍडमिनला वापरता येते. सध्या अनेक व्हॉट्‌सऍप ग्रुपवर ही सुविधा अनेक ऍडमिननी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ही सुविधा ग्रुपवर अथवा व्यक्तिगत सुरू केल्यास त्या व्यक्तीच्या व्हॉट्‌सऍपच्या नावापुढे पहिल्या विंडोमध्ये घड्याळाचे चिन्ह दिसते. 

व्हॉट्‌सऍपने सुरू केलेल्या नवीन फीचरमुळे व्हॉट्‌सऍपवरील सात दिवसांपूर्वीचे मेसेजेस अथवा मीडियाही ऑटोमॅटिकली डिलिट होणार आहेत. यामुळे व्हॉट्‌सऍपवरचा लोडही थोडासा कमी होईल. यात तोटा हा आहे, की काही महत्त्वाचे मेसेजेस अथवा मीडिया नजरचुकीने अथवा काही कारणास्तव स्टार करायचा राहून गेल्यास तो परत मिळवण्यासाठी त्रास होणार आहे. याकरिता आवश्‍यक मेसेज स्टार सुविधेचा वापर करून जतन करावे लागणार आहेत. अर्थात डिसऍपिअरिंग मेसेजेस ही सुविधा सुरू अथवा बंद करणे हे वापरकर्त्यांच्या हातात आहे. 
- बाळकृष्ण गायकवाड, 
व्हिडिओ क्रिएटर, माढा 

व्हॉट्‌सऍपच्या या सुविधेचा आपल्याला फायदा होणार आहे. आपण चॅट करतो पण मागील मेसेज तसेच राहतात. प्रत्येकवेळी आपल्या ते मेसेज नको असतील तर ते डिलिट करावे लागत होते. डिसऍपिअरिंग मेसेजेस फीचरमुळे ते करावे लागणार नाहीत. आपोआप सात दिवसांनी डिलिट होतील. याचे तोटे असे मला काहीच वाटत नाहीत. मेसेजचा स्क्रीनशॉट काढून तो मेसेज आपण सुरक्षित ठेवू शकतो. 
- वल्लभ कुलकर्णी,
क्रिएटिव्ह आर्टिस्ट, माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com