अकलूज नगरपालिका, नातेपुते आणि श्रीपूर-महाळूंग नगरपंचायत करण्याचा अंतिम निर्णय कधी ? 

सुनील राऊत 
Tuesday, 8 September 2020

विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न 
अकलूज नगरपालिका, श्रीपूर-महाळुंग आणि नातेपुते नगरपंचायत 11 सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर होऊनही अंतिम अध्यादेश अद्याप निघालेला नाही. यामागे पक्षीय राजकारण आणि माळशिरस तालुक्‍याचा विकास थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक पयत्न असल्याचा आरोप आता केला जात आहे. नवीन बदल होणे गावांच्या विकासासाठी गरजेचा असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. 

नातेपुते (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते, श्रीपूर-महाळुंग येथे नगरपंचायत करण्याचा निर्णय भाजपच्या राज्य सरकारने 11 सप्टेंबर 2019 रोजी राज्यपालांनी अध्यादेशाद्वारे जाहीर केला होता. परंतु राज्य सरकार बदलले आणि येथील नगरपालिका, नगरपंचायतीची अंतिम घोषणा राजकीय कारणांमुळे लांबत चालली आहे. दरम्यान, यासाठी कोरोना हे कारण दिले जात आहे. 
या तीन गावांमधील लोकांमध्ये राज्यसरकार विषय प्रचंड नाराजी असून लवकरात लवकर अध्यादेश काढून वरील ग्रामपंचायती विसर्जित करून त्यांचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये करावे अशी मागणी होत आहे. 15 ऑगस्ट 2017 रोजी नातेपुते ग्रामपंचायतीने नगरपंचायत करावी असा ठराव केला होता. त्यानंतर श्रीपूर, महाळुंग आणि अकलूज यांनी ठराव केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन 11 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी यांनी वरील ग्रामपंचायतींचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. त्यानंतर राज्य सरकारने 11 सप्टेंबर 2019 रोजी नोटीफिकेशन प्रसिद्ध करून वरील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत व नगरपालिकेत केल्याचे जाहीर केले. जानेवारी 2020 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे स्थायी समितीच्या बैठकीत वरील ठरावास मान्यता दिली. 6 नोव्हेंबर 2019 रोजी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही सकारात्मक अभिप्राय पाठवला आहे. 
या तिन्ही ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींची मुदत 10 नोव्हेंबर 2020 रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर नवीन प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीचे अधिकारी न येता नगरपालिका व नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी म्हणूनच यावेत. तरच राज्य सरकारचा दोन वेळा होणारा आर्थिक खर्च कमी होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

अकलूज नगरपालिका, श्रीपूर-महाळुंग आणि नातेपुते नगरपंचायत 11 सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर होऊनही अंतिम अध्यादेश अद्याप निघालेला नाही. यामागे पक्षीय राजकारण आणि माळशिरस तालुक्‍याचा विकास थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक पयत्न असल्याचा आरोप आता केला जात आहे. नवीन बदल होणे गावांच्या विकासासाठी गरजेचा असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When is the final decision to form Akluj Municipality Natepute and Shripur Mahalung Nagar Panchayat