विठुरायाच्या पूजेसाठी वारकरी प्रतिनिधीचा मान कोणाला मिळणार?

अभय जोशी
सोमवार, 29 जून 2020

दरवर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेवेळी दर्शनाच्या रांगेतील वारकरी दाम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान त्या वारकरी पती- पत्नीस दिला जातो. यंदा दर्शनाची रांग नसल्यामुळे हा मान कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता आहे.

पंढरपूर (सोलापूर) : दरवर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेवेळी दर्शनाच्या रांगेतील वारकरी दाम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान त्या वारकरी पती- पत्नीस दिला जातो. यंदा दर्शनाची रांग नसल्यामुळे हा मान कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता आहे.
१ जुलैला आषाढी एकादशी आहे. श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब येणार आहेत. दरवर्षी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते. या दर्शनाच्या रांगेत मंदिराजवळ उभारलेल्या वारकरी दांपत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान दिला जातो. काही वर्षांपासून ही प्रथा सुरु झाली आहे. महापूजेच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्याचा सत्कार केला जातो आणि एसटी महामंडळाच्या वतीने वर्षभराचा मोफत प्रवासाचा पास दिला जातो. यंदा यात्रेसाठी वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सहाजिकच दर्शनाची रांग असणार नाही. त्यामुळे वारकरी प्रतिनिधी म्हणून कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती याविषयीचा निर्णय घेणार आहे.
यंदा वारकऱ्यांना येण्यास मज्जाव केला असल्यामुळे वारकरी प्रतिनिधीचा मान यंदा पंढरपूर नगरपालिकेच्या सफाई कामगार दांपत्यास देण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांना भेटून श्री वाघमारे यांनी लेखी निवेदन दिले आहे.
दुसरीकडे वारकरी प्रतिनिधी म्हणून शेतकरी दांमपत्यास मान द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केली आहे. या संदर्भात भोसले यांनी जिल्हाधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. विठ्ठालाचा भक्त असलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या आषाढीचा मुख्यमंत्र्यासोबत महापूजा कऱण्याचा मान द्यावा अशी मागणी केली आहे.
विठ्ठल हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे दैवत मानले जाते. वारीला येणारे बहुतांश शेतकरी वारकरी असतात. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतीमालाला हमी भाव नसल्याने शेतकरी संकाटात आहेत. यंदा कोरोनामुळे तर शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आत्मिक दिलासा देण्यासाठी त्याच्या दैवताची पूजा कऱण्याचा मान शेतकरी भक्ताला द्यावा अशी मागणी भोसले यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which Warakaris will get the honor of worshiping Vitthal Rukmini in Pandharpur