
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक म्हणाले...
सोलापूर : महापालिकेतील विभागीय कार्यालय पाचमधील दोन कर्मचाऱ्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपयांची लाच घेतली. त्या दोघांनाही आज (बुधवारी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस हवालदार राशिद बाणेवाले, अर्चना स्वामी, स्वप्नील सणके यांच्या पथकाने केली. सल्लाउद्दिन शेख आणि मनोज पाटोळे या दोघांना अटक करण्यात आली असून उद्या (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती या विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक म्हणाले...
तक्रारदार हा विवाह नोंदणीसाठी विभागीय कार्यालय पाच येथे गेला होता. त्यावेळी त्या दोघांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच घेतली होती. मात्र, प्रमाणपत्र आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पाचशे रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला आणि या विभागाने सापळा रचला. त्या दोघांना रक्कम लहान असल्याने अशी कारवाई होईल, याची काहीच कल्पना नव्हती. मात्र, लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कविता मुसळे यांच्या पथकाने पाचशे रुपये घेताना त्या दोघांना रंगेहाथ पकडले. सल्लाउद्दिन शेख हा कनिष्ठ श्रेणी लिपिक असून पाटोळे हा मजूर म्हणून त्याठिकाणी कामाला आहेत. दरम्यान, कायदेशीर काम करताना कोणत्याही नागरिकांनी कोणालाही पैसे (लाच) देऊ नये. पैशांची मागणी होत असल्यास संबंधितांनी आम्हाला संपर्क करावा, असे आवाहनही पाटील यांनी 'सकाळ'च्या माध्यमातून केले आहे.