आषाढी वारीच्या चर्चेसाठी पुढाकार कोण घेणार? वारकरी संभ्रमात

Who will take the initiative to discuss Ashadi Wari Warakari in confusion
Who will take the initiative to discuss Ashadi Wari Warakari in confusion

नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : पंढरपूर येथील आषाढी वारीकडे महाराष्ट्राचा अध्यात्मिक सोहळा म्हणून पाहिले जाते. ही आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी वारी होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम आहे. मात्र, यावर शासन, प्रशासन व पालखी सोहळ्या संदर्भातील महत्वाचे घटक कोणताही निर्णय घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य वारकऱ्यांचा संभ्रम वाढला आहे. 
दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला पंढरपूर येथे पालखी सोहळ्या संदर्भात बैठक होते. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होते. यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे अद्यापर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आत्तापर्यंत वारीच्या संदर्भात विश्वस्त, फडकरी, मानकरी, सोहळा प्रमुख यांच्या दोन ते तीन बैठका व्हायला पाहिजे होत्या व त्या अनुषंगाने शासनाला, प्रशासनाला संदेश देणे गरजेचे होते. मात्र असे अद्याप तरी झालेले नाही. आषाढी सोहळ्यात सर्वात जास्त वारकरी असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील विश्वस्तांशी पुढील नियोजनाची माहिती घेण्यासाठी काही जणांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा संवाद होऊ शकला नाही. वारकरी संप्रदाय हा अडेलतट्टू नाही. वारकरी संप्रदायाने सातत्याने समंजस्याची भूमिका घेतलेली आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना विश्वासात घेऊन चर्चा, धोरण निश्‍चित केल्याशिवाय वारी सोहळ्याबाबतची त्यांच्या मनातील संभ्रमावस्था दूर होणार नाही. 
आषाढी वारीच्या निमित्ताने दिंडीकरी, फडकरी यांची तयारी दोन महिने अगोदर सुरू असते. वारी हा भावनिक मुद्दा असल्याने शासनही याविषयी लगेच कोणताही निर्णय घेणार नाही. त्यामुळे तिकडे शासन सुस्त, इकडे पालखी संदर्भातील निर्णय घेणारे प्रमुख लोक सुस्त असे आजचे चित्र आहे. मात्र या दोन्हीच्यामध्ये सर्वसामान्य वारकरी मात्र संभ्रमावस्थेत आहे. 
आज मितीला वारी संदर्भात निर्णय घेताना कोणत्याही एका पालखीचा विचार करून चालणार नाही. श्री विठ्ठलावर निष्ठा, श्रद्धा असणारा वारकरी दुसऱ्यांच्या भल्यासाठी संयमाची भूमिका घेतो. नुकत्याच झालेल्या चैत्र वारीमध्ये स्थानिक फडकऱ्यांनी नियमाच्या चौकटीत राहून सर्व वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सेवा पूर्ण केली होती. पण, आषाढी वारीबाबत अद्याप प्राथमिक चर्चाही करण्यासाठी शासन-प्रशासनाकडून तसेच पालखी सोहळ्यातील मान्यवरांकडून झालेली नाही. 
लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर वारी सोहळ्यासंदर्भांत चर्चेसाठी धोरण ठरेल, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु झाला. पण, काहीच हालचाली दिसत नाही. प्रशासनापुढे कोरोनाचे आव्हान मोठे आहे. पण, त्यासोबत राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक परंपरा सोहळा काही दिवसांवर आला असून त्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा आवश्‍यक 
प्रमुख सात पालखी सोहळ्याचे समन्वयक, मानकरी यांच्यासह पालखी प्रस्थान असणारे जिल्हे, त्या मार्गावरील इतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सोलापूर जिल्ह्यात सोहळा एकत्रित येणार असल्याने येथील जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एकत्रित तातडीने व्हिडीओ कॉंन्फरन्सद्वारे चर्चा होणे गरजेची आहे. 

वारकऱ्यांपर्यंत वेळेत निर्णय पोहचणे गरजेचे 
सध्या, सोशल मिडीयाद्वारे होणाऱ्या चर्चा, उठणाऱ्या वावड्यांमुळे वारकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. दिंडी सोहळ्यातील वारकरी शिस्त, पावित्र्य जपतात. संबंधितांची चर्चा झाल्यास त्यामध्ये होणारा निर्णय वारकऱ्यांपर्यंत पोहचेल. पण, दरवर्षी लाखोंच्या संख्येने मोकळा समाज वारी सोहळ्यात स्वतंत्रपणे चालत असतो. ती संख्या मोठी असून त्यांच्यापर्यंत निर्णय न पोहोचल्याने ते पंढरीकडे निघाल्यास, त्यास प्रशासन जबाबदार राहिल. 

परंपरा जपली पाहिजे अन्‌ प्रादुर्भावही टाळला 
वारी सोहळ्याची परंपरा जपली पाहिजे अन्‌ प्रादुर्भाव टाळला पाहिजे, याबाबत वारकरी सकारात्मक आहेत. सध्याच्या परिस्थितीत एका पालखी सोहळ्याशी चर्चा करून उपयोग नाही. राज्यभरातून 100 ते दीडशे पालख्या येतात. 400- 500 मोकळ्या दिंड्या येत असून त्यामध्ये 15 ते 20 लाख सहभागी लोकांचा प्रश्न आहे. 35 ते 40 दिवसांवर सोहळा आला आहे. पण, अद्याप चर्चा होताना दिसत नाही. त्वरीत शासन-प्रशासनाने चर्चा करून सोहळ्याबाबत धोरण निश्‍चित करावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com