सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊसदराबाबत गप्प का? शेतकऱ्यांचा सवाल 

संतोष सिरसट
Tuesday, 10 November 2020

ऊसदराची कोंडी फोडणार कोण? 
शेजारील जिल्ह्यातील कारखानदारांनी जिल्ह्यातील ऊस घेऊन जात असताना पहिली उचल किती देणार हे जाहीर केले आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही कारखानदाराने दराबाबत अद्याप चकार शब्दही काढला नाही. कारखानदारांच्या अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्याकडे सरकारने लक्षही दिले पाहिजे. पण, कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसदराचा तिढा सोडविण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोणता साखर कारखाना पुढाकार घेतो, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याला साखरेचे माहेरघर म्हटले जाते. राज्यात सर्वाधिक कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. मागील काही दिवसांपसून गाळप हंगाम सुरुही झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने शेजारील जिल्ह्यातील कारखान्यांचा डोळाही सोलापूरच्या ऊसावर आहे. शेजारील जिल्ह्यातील कारखानदार सोलापूरमध्ये येऊन ऊस खरेदी करु लागले आहेत. त्यांनी ऊसाचा दरही जाहीर केला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ऊस दराबाबत अद्यापही गप्पच आहेत. ऊस दराच्या बाबतीत कारखानदार काय बोलत नाहीत असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेल्या नॅचरल शुगरने जिल्ह्यातील ऊस उचलण्यास सुरवात केली आहे. त्यांनी आपी पहिली उचल दोन हजार 880 रुपये जाहीर केली आहे. त्याचबरोबर शेजारच्या इंदापूर तालुक्‍यातील सोमेश्‍वर साखर कारखान्याने पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केली आहे. पण, जिल्ह्यातील कारखानदार अद्यापही गप्पच आहेत. कारखान्यांच्या अध्यक्षांचे सध्या केवळ ऊस गाळपाकडेच लक्ष आहे. पण, दराच्या बाबतीत हे शांतच आहेत. शेजारील जिल्ह्यातील साखर कारखानदार सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळपासाठी घेऊन जात आहेत. जो जास्त पैसे देईल त्याला ऊस देण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय "हजीर तो वजीर' या उक्तीप्रमाणे कारखानदार ऊस मागण्यासाठी आला असता त्याला ऊस देण्याची मानसिकताही शेतकऱ्यांनी ठेवली आहे. 

शेतकरी संघटनांनी आक्रमक होण्याची गरज 
ऊस दराच्या प्रश्‍नाबाबत शेतकरी संघटनांनी काही प्रमाणात आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम कारखानदारांवर होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या प्रश्‍नाबाबत अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. शेतकरी संघटना आक्रमक झाल्या की शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे संघटनांना आपला पवित्रा आता बदलावा लागणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why are sugar mills in Solapur district silent about sugarcane? The question of farmers