नरवीर बापू गोखले यांची समाधी ब्रिटिशांनी पाण्याखाली का बुडवली?

WhatsApp Image 2021-02-18 at 7.50.34 PM (1).jpeg
WhatsApp Image 2021-02-18 at 7.50.34 PM (1).jpeg

मोहोळ (सोलापूर) : इतिहासप्रसिद्ध आष्टीच्या लढाईचे ठिकाण आपल्याच जिल्ह्यात सुविधांअभावी पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचे सेनापती बापू गोखले व कोल्हापूर संस्थानचे राजे बुवासाहेब ऊर्फ शहाजीराजे यांचे समाधीस्थान व येथील तलाव आष्टी हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकासित करण्याची गरज आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा मिळाल्या तर आष्टी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल. मराठ्यांच्या इतिहासात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी 1818 ची आष्टीची लढाई ही शेवटची लढाई होती. या लढाईत पेशव्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले हे कामी आल्याने या लढाईने पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटीश साम्राज्याचा उदय झाला. आष्टी गावाजवळील बापू गोखले यांची समाधी ब्रिटीशकाळात क्रांतीकारकांचे प्रेरणास्थळ होत असल्याचे पाहून चाणाक्ष ब्रिटीश सरकारने त्या जागी तलाव बांधून समाधी पाण्यात घालवली. या इतिहासाचा वारसा पाण्याखाली बुडवला. 

आष्टी तलाव व तेथील ब्रिटीशकालिन विश्रामगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. यात सुधारणा केल्यास ऐतिहासिक पर्यटकांना व पक्षीनिरीक्षकांना हे स्थळ निश्‍चितच साद घालेल. आष्टी (ता मोहोळ) येथे 20 फेब्रुवारी 1818 रोजी मराठे व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची सर्वात शेवटची लढाई ठरली. या लढाईला आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात संबोधले जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला आता येवती तलाव असेही संबोधले जाते. या तलावाच्या माध्यमातून या ठिकाणी नौकाविहार व अन्य साधने उपलब्ध केली तर हे ठिकाण जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन होऊ शकते. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यासे ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगारनिर्मिती होऊ शकते. 

आष्टीचे महत्त्व 
आष्टी तलाव व ब्रिटीशकालीन विश्रामगृहासह, खानसामा निवास, पाण्यासाठी असलेला आड व तलावाचा इतिहास लिहिलेला फलक याची सध्या दुरवस्था झाली आहे. या तलावातच नरवीर बापू गोखले यांची समाधी आहे. मार्गशिर्ष शुद्ध एकादशी 1838 मध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे बुवासाहेब ऊर्फ शहाजीराजे पंढरपूरहून तुळजापूरला जात असताना 29 नोव्हेंबर 1838 या दिवशी त्यांचे याच ठिकाणी निधन झाले. आष्टी येथील शाळेजवळ त्यांची समाधी आहे. या ऐतिहासिक ठेव्याची माहिती पर्यटकांना होणे गरजेचे आहे. 

आष्टीत काय पाहाल 
या तलावाच्या काठीच ऐतिहासिक असे विश्रामग्रह पाहण्यासाठी पर्यटकांना मोठी नामी संधी आहे, मात्र त्याची दुरुस्ती करणे आहे. सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. विश्रामगृहाशेजारीच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जेवणासाठी खानसामा निवास आहे. त्या ठिकाणी ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या जेवणाची सोय केली जात असे, सध्या त्याचीही दुर्दशा झाली आहे. पाण्यासाठी जवळच सुमारे शंभर ते सव्वाशे फूट खोलीचा बांधीव आड असून त्याचीही पडझड झाली आहे. ब्रिटिश अधिकारी या विश्रामगृहात राहूनच तलावाची देखरेख व नियंत्रण करीत होते. हे ठिकाण शासनाने पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पंढरपूर-बार्शी मार्गावरील आष्टी गावापासून सहा किमी अंतरावर हे ठिकाण आहे. कालच या लढाईला 202 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आष्टी परिसरातील इतिहासप्रेमींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

असा आहे इतिहास 
महाराणी कैसर व्हिक्‍टोरिया यांनी सन 1876- 77 - च्या दुष्काळात तलावाचे काम सुरू केले.त्यावेळी आष्टी हे गाव माढा तालुक्‍यात होते. तलावाचे एकूण क्षेत्रफळ हजार एकर असून पाणी साठवण क्षमता 15 हजार 500 घनफूट आहे. या तलावाचे काम वर्षभर सुरू होते. या कामावर दररोज 9 हजार 257 मजूर काम करीत होते. सर्वात जास्त मजूर 19 हजार 949 एवढे होते. एकूण खर्च 3 लाख 9 हजार 621 रुपये, एकूण कामाची किंमत 1 लाख 45 हजार 277 रुपये, सन 1878 ला पुन्हा दुष्काळ पडला होतो सन 1880-81 - साली पुन्हा तलावाचे काम सुरू केले.अपूर्ण काम कैद्यांकडून करून घेतले गेले. 1 एप्रिल 1881 रोजी आष्टी तलावात प्रथम पाणी सोडले. 


इतिहास संशोधक संजय पाटील यांनी सांगितले की, आष्टीच्या सन 1818 च्या इंग्रज-मराठा युद्धाने जरी मराठे शाहीचा अस्त झाला असला तरी या युद्धात सेनापती नरवीर बापू गोखलेंच्या नेतृत्वात मराठा फौजेने पराक्रमाची शर्थ केली होती. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा शेवट आष्टी गावी झाला. त्यामुळे हे गाव पुन्हा मराठ्यासाठी प्रेरणास्थान बनू नये म्हणून इंग्रजांनी युद्धस्थळाच्या ठिकाणी तळे खोदले. आष्टी गावात शेवटचे मराठा सेनापती बापू गोखले यांचे भव्य स्मारक झाले आणि तलाव परिसर एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले तर शिवप्रेमींना येथून पुन्हा नवी ऊर्जा मिळेल 


सन 2013-14 साली या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावे, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत शासनाची उदासीनता आहे, असे येवती ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सोमनाथ माने यांनी सांगितले. 

हॉटेल उद्योजक बाळासाहेब गवळी म्हणाले की, आष्टी तलाव परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले तर हॉटेल व्यवसाय, पर्यटकांच्या नाष्टा, जेवणाची सोयीसाठी नव्या व्यावयिकांनी रोजगाराची संधी मिळेल. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com