पत्नीस लपवून ठेवल्याने सासूला मारहाण

संजय पाठक
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सोलापूर ते कुर्डुवाडी या बसमध्ये चढत असताना चोरट्याने वकीलाच्या खिशातून पाकीट चोरले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास सोलापूर बसस्थानकावर घडली.

सोलापूर : पत्नीस घरी लपवून ठेवल्याच्या कारणावरून कविता उल्हास शेवाळे (वय 43, रा. कुमठे गाव, ता. दक्षिण सोलापूर) यांना मारहाण करण्यात आली. सोलापूर महापालिका येथे जावई विशाल शिंदे व त्याच्या आईने कविता शेवाळे यांना मारहाण केली. जखमी अवस्थेत राहूल बनसोडे यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. 

क्‍लोरीन वायुमुळे तरुणांना त्रास 
विजापूर रोडवरील जलतरण तलावाच्या ठिकाणी क्‍लोरीन वायूच्या वासाने दोघा तरुणांना त्रास झाला. अल्ताफ बशीर अहमद हंचनाळ (वय 19), अल्ताफ बाबू छपरबंद (वय 19, रा. 17, दोघे रा. दोन नंबर झोपडपट्टी, विजापूर नाका, सोलापूर) अशी त्रास झालेल्या दोघा तरुणांची नावे असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. 

बसमध्ये चढताना वकीलाचे पाकीट पळविले 
सोलापूर ते कुर्डुवाडी या बसमध्ये चढत असताना चोरट्याने वकीलाच्या खिशातून पाकीट चोरले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास सोलापूर बसस्थानकावर घडली. ऍड. अभिनंदन नारायण कापसे (वय 29, रा. कमला नगर, हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे. ऍड. कापसे हे सोलापूर येथून कुर्डुवाडीला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. चोरट्याने ऍड. कापसे यांच्या पॅन्टच्या मागील खिशात हात घालून पाकीट चोरुन नेले आहे. पाकीटामध्ये वकिली व्यवसायाचे नोंदणी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड व 2300 रुपयांची रोकड होती. पोलीस हवालदार साखरे तपास करीत आहेत. 

जनावरांच्या हाडामासांचे तुकडे टाकल्याने दुर्गंधी 
जनावरांच्या अवयवांचे अवशेष, शेण, हाडाचे तुकडे टाकल्याने कुरेशी गल्ली परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अज्ञात व्यक्तीने बेरीया हॉलच्या मागे असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेवर जनावरांच्या हाडांचे तुकडे, मांस टाकले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत जगन्नाथ अंगुले यांच्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, कोणालाही काहीही माहित नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife-in-law beat her while hiding his wife