आता टार्गेट सरपंचपद ! विजयाच्या गुलालासह नंदेश्वरचे "हे' सदस्य गडप; धोक्‍याच्या शक्‍यतेने अज्ञातस्थळी रवानगी

हुकूम मुलाणी 
Saturday, 23 January 2021

ग्रामपंचायतीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या व नवीन सदस्यही निवडून आले. मात्र, अद्याप सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने यादरम्यान, आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांना विरोधी गटाने आमिषे दाखवून त्यांच्या गटात सामील करून घेऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करण्यात गटांचे प्रमुख गुंतले आहेत. असाच एक प्रकार नंदेश्‍वर गावात दिसून आला. 

मंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या व नवीन सदस्यही निवडून आले. मात्र, अद्याप सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने यादरम्यान, आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांना विरोधी गटाने आमिषे दाखवून त्यांच्या गटात सामील करून घेऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करण्यात गटांचे प्रमुख गुंतले आहेत. असाच एक प्रकार नंदेश्‍वर गावात दिसून आला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचा गुलाल उडून जाण्यापूर्वीच आमदार प्रशांत परिचारक गटाचे माजी उपसभापती समर्थक दादा गरंडे यांचे समर्थक सात सदस्यांना सरपंच निवडीपर्यंत कोणताही धोका वा दगाफटका होऊ नये म्हणून अज्ञातस्थळी पाठवण्यात आले आहे. 

तालुक्‍यात 23 ग्रामपंचायतींचा निवडणूक आखाडा पार पडला. या आखाड्यातील उमेदवार निवडीपासून ते मतमोजणीपर्यंत तालुक्‍याचे लक्ष नंदेश्वर ग्रामपंचायतीकडे होते. या गावात निवंगत आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर त्याचबरोबर शिवसेनेलाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत होणारी चुरस ही लक्षवेधी ठरणारी असते. त्यामुळे निवडणुकीत सरस राहावे यासाठी या गावातील कोणत्याही गटाचा राजकीय नेता आपापल्या परीने जिद्दीने पेटला जातो. ती जिद्द पुरी करण्यासाठी खर्च किती करावा लागतो, यापेक्षा यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते, याकडे अधिक लक्ष दिले जाते, हे सर्वश्रुत आहे. म्हणून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या गावाची निवडणूक बिनविरोध झाली तर आपल्या निधीतून रुग्णवाहिका भेट देण्याची घोषणा केली होती. परंतु याकडे कोणत्याही राजकीय नेत्याने गांभीर्याने लक्ष न देता निवडणुकीकडे अधिक लक्ष दिले. 

गत निवडणुकीत दोन सदस्य असताना चिठ्ठीवर गरंडे गटाला संधी मिळाली होती. आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांत दोन गट पडले. माजी उपसभापती दादा गरंडे यांच्या गटाबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर यांचे गट एकमेकांच्या विरोधात ठाकले.

जानकर गटाला भालके व आवताडे समर्थकांचा पाठिंबा होता. निकालामध्ये माजी उपसभापती दादा गरंडे यांच्या गटाला सात जागा मिळाल्या तर विरोधी गटाला सहा जागा मिळाल्या. एका जागेमुळे त्यांना गटाची सत्ता मिळाली. परंतु सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित नाही, ते आरक्षण निश्‍चित होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असताना, आपल्या गटाच्या सदस्यांना विरोधी गटाने सत्तेसाठी आमीष दाखवून कोणताही अडथळा आणू नये म्हणून सजाबाई गरंडे, विमल गरंडे, सखूबाई गरंडे, काशिलिंग करे, सुनील डांगे, मुक्ताबाई लवटे, रखमाबाई शिंदे या सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवण्याचा निर्णय घेत मतमोजणीनंतर या नूतन सदस्यांची अज्ञातस्थळी रवानगी करण्यात आली. हे सर्व सदस्य सरपंच निवडी दिवशीच गावात परतणार असल्यामुळे ग्रामस्थांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The winning members of Nandeshwar Gram Panchayats Paricharak group were sent to unknown place