डोक्‍यावरील कर्ज व अतिवृष्टीमुळे द्राक्षबागेचे नुकसान झाल्याने मानेगावात शेतकरी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

वैभव देशमुख 
Tuesday, 27 October 2020

माढा तालुक्‍यातील मानेगाव येथील शेतकरी अशोक प्रल्हाद शेळके यांच्या पत्नी राजश्री अशोक शेळके यांनी कर्जबाजारीपणा व द्राक्षबाग अयशस्वी गेल्याने नैराश्‍यातून सोमवारी (ता. 26) द्राक्षबागेचे कराटे नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्या जगदाळे मामा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

मानेगाव (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील मानेगाव येथील शेतकरी अशोक प्रल्हाद शेळके यांच्या पत्नी राजश्री अशोक शेळके यांनी कर्जबाजारीपणा व द्राक्षबाग अयशस्वी गेल्याने नैराश्‍यातून सोमवारी (ता. 26) द्राक्षबागेचे कराटे नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्या जगदाळे मामा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. 

या वर्षी मानेगाव परिसरात सर्वच द्राक्षबागा अति पावसामुळे धोक्‍याच्या पातळीवर आहेत. द्राक्ष बागेवर केलेला लाखो रुपयांचा खर्च कसा निघणार, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मानेगाव येथे अशोक शेळके यांची दोन एकर द्राक्षबाग आहे. पाच वर्षांपासून त्यांच्याकडे द्राक्षबाग आहे; मात्र या वर्षी आलेल्या अस्मानी संकटामुळे व अतिवृष्टीमुळे त्यांच्या द्राक्षबागेला द्राक्षच लागले नाहीत. यातच द्राक्ष बागेसाठी केलेला मोठ्या प्रमाणावर खर्च, फवारणीसाठी घातलेले लाखो रुपये, मजुरी हा सर्व खर्च मिळून त्यांच्यावर आठ लाख रुपयांचे कर्ज होते. यातच काही खासगी सावकारांकडे व बॅंकेचे कर्ज त्यांच्यावर होते. बॅंकवाले व खासगी सावकार त्यांना पैशाचा सतत तगादा लावत होते. मात्र या वर्षी द्राक्षबाग पूर्णपणे वाया गेल्यामुळे या लोकांचे देणे कसे द्यायचे? या नैराश्‍यातून राजश्री शेळके या सोमवारी (ता. 26) सकाळी त्यांच्या द्राक्षबागेत गेल्या. द्राक्षबागेला एकही द्राक्षाचा घड आलेला नाही. लोकांचे पैसे, बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे, या तणावात त्या होत्या. याच तणावाखाली द्राक्ष बागेमध्ये कराटे नावाचं विषारी औषध त्या ठिकाणी होते, ते विष त्यांनी प्राशन केले. त्यानंतर जागेवरच बेशुद्ध पडल्या. 

त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. मात्र जहाल विषामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास धोका आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या बार्शी येथील डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. याबाबत बार्शी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. सध्या त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. बागेचे पूर्ण पीक वाया गेले. घरी मुलगा, मुलगी, नवरा हा प्रपंच कसा चालवायचा, असा प्रश्न राज्यश्री शेळके यांना सतावत होता. या सर्व नैराश्‍यातूनच त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे मानेगाव परिसरातील द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

याबाबत मानेगाव येथील द्राक्ष बागायतदार अजय देशमुख म्हणाले, मानेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा या अति पावसाने पूर्णपणे वाया जात आहेत. त्यामुळे सरकारने हेक्‍टरी पन्नास हजार रुपये अनुदान तत्काळ द्यावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman farmer in Manegaon tried to commit suicide as her vineyard was damaged due to heavy rains