esakal | Women's day 2021 : अवघ्या 27 वर्षीय बीएस्सी ऍग्री ज्योती बाबर गादेगावच्या सरपंच !

बोलून बातमी शोधा

Jyoti Babar}

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बीएस्सी ऍग्रीपर्यत शिक्षण घेतलेल्या आणि गावाच्या विकासाची तळमळ असलेल्या ज्योती विष्णू बाबर यांनी नुकतीच सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार करुन त्या कामाला लागल्या आहेत. 

Women's day 2021 : अवघ्या 27 वर्षीय बीएस्सी ऍग्री ज्योती बाबर गादेगावच्या सरपंच !
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे या वेळीही अनेक गावांत रस्सीखेच झाली. त्याला गादेगाव तरी कसे अपवाद असणार! येथे अत्यंत चुरशीने निवडणूक झाली. परंतु सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी असताना त्या खुर्चीवर बसण्याचा मान अनुसूचित जातीच्या अवघ्या सत्तावीस वर्षीय तरुणीला देऊन गावाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बीएस्सी ऍग्रीपर्यत शिक्षण घेतलेल्या आणि गावाच्या विकासाची तळमळ असलेल्या ज्योती विष्णू बाबर यांनी नुकतीच सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार करुन त्या कामाला लागल्या आहेत. 

गादेगाव हे पंढरपूर तालुक्‍यातील प्रमुख गावांपैकी एक. गावची लोकसंख्या पंधरा हजारांच्या आसपास. या गावच्या नूतन सरपंच झालेल्या ज्योती यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडील विष्णू बाबर हे अनेक वर्षे बांधकामावर सेंटरिंगचे काम करत. 2012 मध्ये एका अपघातामुळे त्यांची स्मरणशक्ती कमजोर झाली. काम करणे मुश्‍कील झाल्याने तेव्हापासून ते घरातच असतात. ज्योती यांच्या आई शिवगंगा या माऊलीने शिवणकाम करून तर भावांनी छोटेमोठे काम करून कुटुंब चालवले. अशा परिस्थितीत ज्योती यांनी अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातून उत्तम गुण मिळवत बीएस्सी ऍग्री शिक्षण पूर्ण केले. काही दिवस सोलापुरातील नेहरू युवा केंद्रात नोकरी केल्यानंतर आता त्या पंढरपुरात खासगी नोकरी करत आहेत. 

1999 मध्ये ज्योती यांच्या आई वॉर्ड क्रमांक पाचमधून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या वेळीही त्यांनाच संधी द्यावी, असे ठरवून सिद्धनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलमधील मंडळींनी त्यांच्याकडे विचारणा केली. परंतु, त्यांनी या वेळी आपल्याऐवजी आपली लेक ज्योती यांना संधी देण्याची भावना बोलून दाखवली. पॅनेलमधील सर्वांनी उच्च शिक्षण घेतलेली ज्योती ग्रामपंचायत सदस्य झाल्यास गावचा फायदा होईल, असा विचार करून ज्योती यांच्याशी चर्चा करून त्यांना उमेदवारी दिली. सिद्धनाथ पॅनेलने 15 पैकी 11 जागा जिंकत बहुमत मिळवले. सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे त्यासाठी पात्र ठरणाऱ्या ज्योती बाबर यांची सरपंचपदी निवड निश्‍चित मानली जात होती. गावकऱ्यांनी अवघे सत्तावीस वय असलेल्या ज्योती यांची सरपंचपदी निवड होण्याआधीच सत्कार करून शुभेच्छाही दिल्या. 

दरम्यान, आरक्षणात बदल झाला अन्‌ सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले. साहजिकच आता ज्योती यांना सरपंचपद मिळणार की नाही, याविषयी गावात चर्चा सुरू झाली. परंतु पॅनेलमधील सर्वांनी पहिल्या निर्णयावर ठाम राहून ज्योती यांना सरपंच करण्याचा निर्णय घेऊन बिनविरोध सरपंच केले. गादेगावकरांच्या या भूमिकेचे तालुक्‍यातून जोरदार स्वागत झाले. 

ग्रामपंचायतीच्या पंधरापैकी नऊ सदस्य महिला असल्याने गावात महिलाराज आले आहे. त्यात वयाने ज्योती सर्वांत लहान. पॅनेलमधील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याने आणि नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या साथीने त्यांनी गावाच्या विकासाचे नियोजन सुरू केले आहे. कोणत्याही कामाचे नियोजन असेल आणि प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका असेल तर यश निश्‍चित मिळते, यावर ज्योती यांचा विश्वास आहे. त्यामुळेच आता त्या जिद्दीने कामाला लागल्या आहेत. 

ज्येष्ठ मंडळींनी आपल्यात आत्मविश्वास निर्माण केला असून आपण उत्तम काम करून दाखवू, असा ज्योती यांना विश्वास वाटतो आहे. बचत गटाच्या महिलांना मार्केटिंगसाठी मदत करू, गावातील गरजू महिलांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार ज्योती यांनी केला आहे. गावातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन आगामी काळात त्या दृष्टीने नियोजन करणार असल्याचे ज्योती यांनी सांगितले. 

ज्योतीला सरपंच पदाची संधी मिळेल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. अजूनही खरे वाटत नाही. खूप आनंद झाला आहे. आमच्या गावकऱ्यांनी क्रांती केली. मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीच्या चाव्या माझ्या लेकीच्या हाती दिल्यात. ती सगळ्यांच्या साथीने गावचे भले करेल. ती सर्वांना सोबत घेऊन काम करेल. 
- शिवगंगा बाबर, 
ज्योती बाबर यांच्या आई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल