महिला दिन विशेष : `या ` महापालिकेत पतींचीच फुकट फाैजदारी

महिला दिन विशेष : `या ` महापालिकेत पतींचीच फुकट फाैजदारी

सोलापूर : निवडणुकीवेळी हात जोडणाऱ्या महिला नगरसेविका झाल्यावर "गुंगी गुडिया' बनतात. सोलापूरला आता गरज आहे ती विकासकामांच्या प्रश्‍नांवर प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या "बोलक्‍या बाहुल्यांची'. पतीराजांच्या "फुकट फौजदारी'पुढे त्यांचे काही चालत नसल्याचे दिसून येते.

महापालिकेतील 52 नगरसेविकांपैकी अपवाद वगळता निम्म्याहून अधिक नगरसेविकांचे पतीच कारभार पाहतात. पती आणि वडील ही कामे करीत असतील, तर नगरसेविका काम करण्यास कार्यक्षम नाहीत का? पालिकेच्या सभा व निवडणुकांना हजेरी लावणे इतकेच काम नगरसेविकांचे आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा 50 टक्के सहभाग ही जरूर चांगली संकल्पना. हक्काचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला आणि त्या प्रभागात आपल्याला उभे राहता येत नाही म्हणून बहुतेक पतीराजांनी आपल्या पत्नींना निवडून आणले. नगरसेविका केवळ नामधारी आणि पतीच कारभारी बनले.

महिलांना नगरसेवक झाल्या झाल्या कामाची माहिती होणार नाही हे खरे आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत पती असणे हेही स्वाभाविक आहे. पण महापालिकेत बहुतेक नगरसेविकांच्या बाबतीत उलटे घडले. केवळ सर्वसाधारण सभेदिवशी नगरसेविकांना सभागृहात उपस्थित ठेवले गेले व सर्व कारभारावर त्यांच्या पतीचेच नियंत्रण राहिले आहे. सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी सर्व नगरसेवकांची बैठक असते. या बैठकांतही पतींचा वावर वाढला आहे.

 
 56 वर्षांत सात महिला महापौर  
महापालिकेच्या 56 वर्षांच्या इतिहासात सात महिलांना महापौरपदाची संधी मिळाली. बंजारा समाजातील शेवंताबाई पवार पहिल्या महिला महापौर झाल्या. मागास प्रवर्गातील या महिला व्यवस्थित कारभार करतील का? अशी शंका सुरवातीला व्यक्त करण्यात आली. मात्र, अतिशय जबाबदारीने सौ. पवार यांनी सभागृहाचे कामकाज केले. नलिनी चंदेले दुसऱ्या महिला महापौर. तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल 10 ते 12 वेळा खास पाण्यासाठी मुंबईला वारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पाण्याची पातळी कमी झाली, की यांचा मुंबई दौरा ठरलेला असायचा. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा ही त्यांच्या कालावधीतील कामे. अरुणा वाकसे तिसऱ्या महिला महापौर. रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पातील काही कामे त्यांच्या कालावधीत झाली. त्यानंतर अलका राठोड महापौर झाल्या, त्या सोलापूरच्या चौथ्या तर बंजारा समाजातील दुसऱ्या महापौर. त्यांच्या कारकिर्दीत हद्दवाढ विभागात ड्रेनेजलाइनच्या कामाला चालना मिळाली. प्रा. सुशीला आबुटे यांच्या महापौरपदाच्या कालावधीत सोलापूर शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाली. 2017 मध्ये महापालिकेत सत्तांतर झाले आणि शोभा बनशेट्टी या कॉंग्रेसेतर पहिल्या महिला महापौर ठरल्या. समांतर जलवाहिनीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झाला. विद्यमान महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या कालावधीत स्मार्ट सिटीतील विविध कामे मार्गी लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com