
मोहोळ नगरपरिषद हद्दीतील आठवडा बाजार येथे वैशिष्ट्य व नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत अद्ययावत अशी दोन मजली 58 लाख 69 हजार रुपये किमतीचे महिला प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहरातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न करू, असे अश्वासन प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी शहरातील महिलांना दिले होते. त्याचा पाठपुरावा करून मोहोळ नगरपरिषद हद्दीतील आठवडा बाजार येथे वैशिष्ट्य व नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत अद्ययावत अशी दोन मजली 58 लाख 69 हजार रुपये किमतीचे महिला प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.
या भव्य अशा नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ नुकताच विठाबाई नागनाथ बारसकर यांच्या हस्ते व मोहोळ शहरातील महिलांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पायाभरणी कार्यक्रमानंतर क्षमा रमेश बारसकर यांनी मोहोळ शहरातील महिलांसाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला प्रशिक्षण केंद्राचे वैशिष्ट्य
या महिला प्रशिक्षण केंद्रामुळे मोहोळ शहरातील महिलांना सुमारे दोनशे वेगवेगळ्या उद्योगांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे, तर प्रशिक्षणार्थी महिलांना मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उद्योग उभारणीसाठी विविध बॅंकांतून कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होऊन त्या स्वावलंबी होण्यास या प्रशिक्षण केंद्रामुळे मदत होणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल