
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये निधन झालेल्या स्वतःच्या आई- वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही परगावी, परजिल्ह्यात नोकरी- व्यवसायासाठी गेलेल्या मुलांना उपस्थित राहता न आल्याने, मयताच्या पत्नीलाच पतीच्या चितेला मुखाग्नी देण्याची वेळ आली होती. आता तर लॉकडाउनमुळे लाकडाचे वखार बंद असल्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई निर्माण झाल्याने मृतदेहावर करावयाच्या अग्निसंस्काराचा प्रश्न समोर येत आहे.
शांती चौक येथील पद्मशाली समाजाच्या शांती धाम स्मशानभूमी येथे 'अंत्यविधी पॅकेज' पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करणारे वेणुगोपाल कोडम यांनी लॉकडाउन सुरू होण्याअगोदरच अंत्यसंस्कारासाठी लागणारे तीन हजार किलो लाकडे जमा करून ठेवले होते. मात्र 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन संपेल, असे वाटत असतानाच 3 मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला. दरम्यान, 22 मार्चपासून आजतागायत दररोज 2-3 मृतदेहाच्या अंत्यसंस्कार पॅकेजसाठी साहित्याची मागणी होत आहे, तसे अंत्यविधीचे इतर सर्व साहित्य कसे तरी मिळवले जात आहेत; मात्र अग्निसंस्कारासाठी महत्त्वाची लाकडे मात्र संपत आली आहेत. लाकडाचे वखार बंद असल्याने, यापुढे अग्निसंस्कार कसे पार पडणार, याबाबत मोठे प्रशचिन्ह आता निर्माण झाले आहे. कारण, अंत्यसंस्कार साहित्य अत्यावश्यक सेवेत मोडत असेल मात्र लाकडे पुरवणारे वखार सुरू करण्यासाठी पोलिस आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. आता या अधिकाऱ्यांनी यातून त्वरित मार्ग काढणे गरजेचे आहे.
ठळक
* रोज 2-3 मृतदेहांवर होत आहे अंत्यसंस्कार
* एक अंत्यसंस्कारासाठी 150 ते 200 किलो लाकडांची गरज
* लाकडाचे वखार बंद असल्याने उपलब्धता नाही
* वखार चालक म्हणतात आम्हाला वखार सुरू करण्याची परवानगी नाही
* अंत्यसंस्कार अत्यावश्यक सेवा असूनही पोलिसांकडे अर्ज केले असता, पोलिस म्हणताहेत 27 एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
माझ्याकडे तीन हजार किलो लाकडे होती, ती आता संपत आली. एक किंवा दोन अंत्यसंस्कार होतील एवढीच लाकडे आहेत. पोलिस आयुक्तालयात अर्ज केला असता 28 एप्रिल रोजी अर्ज करण्यास सांगण्यात आले.
- वेणुगोपाल कोडम, अंत्यविधी साहित्य विक्रेता
माझा लाकडाचा वखार आसरा येथे आहे व मी राहायला पाच्छा पेठेत आहे. लॉकडाउनमुळे वखार बंद आहे. अंत्यसंस्कार विधीसाठी लाकडे पुरवीत असतो आता घराबाहेर पडता येत नाही व वखार उघडून लाकडे देऊ शकत नाही. मात्र पोलिसांनी तशी परवानगी दिली तर लाकडे पुरविणे सोपे होईल.
- मोहम्मद शेख, वखार चालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.