पालकमंत्री भरणे : सोलापूरच्या यंत्रणेचे काम प्रामाणिक, बाहेरील यंत्रणेची नाही आवश्‍यकता

प्रमोद बोडके
Friday, 29 May 2020

मृत्यूचे प्रमाण 10 टक्के 
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींपैकी 60 टक्के व्यक्ती 60 वर्षांवरील आहेत. 65 टक्के व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्यापासून 48 तासांत दगावल्या आहेत. त्यापैकी 70 टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, न्यूमोनिया, किडनी, हृदयाच्या विकाराने पूर्वीपासून आजारी होत्या. कोरोनामुळे वृद्धांचा मृत्यू होत असल्याने वृद्धांना त्यांच्या भागात फिव्हर ओपीडीची सुविधा दिली आहे. वृद्ध, आजारी व्यक्तींना रिक्षा, रुग्णवाहिकेद्वारे आणून सर्व तपासण्या होत असल्याची माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली. 

सोलापूर : कोरोनामुक्त झाले म्हणून घरी सोडले आणि पॉझिटिव्ह म्हणून पुन्हा घेऊन गेले. अशा एक-दोन घटना सोलापुरात निदर्शनास आल्या आहेत. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या स्वॅबच्या नोंदी ऍपद्वारे ठेवण्यात येत आहेत. रुग्णालाही ओटीपी देण्याची व्यवस्था केल्याने रुग्णालाही त्याच्या अहवालाची सद्यःस्थिती समजत आहे. ऍपच्या नोंदीमुळे आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या घटना टळतील, असा विश्‍वास सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. 
"सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सोलापुरातील कोरोनाची स्थिती, प्रशासन व शासनाच्या उपाययोजना याबद्दलची माहिती दिली. पालकमंत्री भरणे म्हणाले, ""आयसीएमआरच्या गाइडलाइन बदललेल्या आहेत. कधी कधी स्वॅब घेतला तरी त्याचा पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह अहवाल येत नाही. पुन्हा 48 तासांत स्वॅब घ्यावा लागतो. रुग्णाला 10 दिवसांत सोडण्याच्या सूचना आयसीएमआरकडून आल्याने कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना सोडण्यात आले. दरम्यान, त्यांच्या स्वॅबचा दुसरा अहवाल संबंधितांकडे पोचण्यास विलंब झाल्याने सोलापुरात अगोदर निगेटिव्ह आणि नंतर पॉझिटिव्ह अशा घटना घडल्या आहेत.'' 
""सोलापुरातील सर्व यंत्रणा प्रामाणिकपणे आणि पूर्णवेळ काम करीत आहे. शहरात दाट वस्ती असून या वस्तीत विडी कामगार, हातमाग कामगारांची संख्या मोठी आहे. आजारावर त्वरित उपचार करण्याची मानसिकता आणि क्षमता याचा अभाव या वर्गात दिसत आहे. त्यांना सोईचा आणि लगेच उपचार होण्यासाठी, निदान करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्ह्यातील मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याने इतर जिल्ह्यांची, राज्यातील यंत्रणेची मदत घेण्याची सध्या आवश्‍यकता नाही,'' असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. 

छोट्या त्रुटीबाबत मोठ्या तक्रारी 

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन सेंटर व आयसोलेशन सेंटरमध्ये विलगीकरण केले जाते. पूर्वी त्या ठिकाणी निगेटिव्ह व्यक्तींना 14 दिवस विलगीकरण कक्षातच ठेवले जात होते. कोणतीही लक्षणे नसतानाही 14 दिवस घराबाहेर राहण्याची काही जणांची मानसिकता नसते. त्यामुळे छोट्या छोट्या त्रुटीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित सूचनेनुसार आता अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधितांना आवश्‍यक त्या सूचना देऊन होम क्वारंटाइनसाठी सोडण्यात येते. संशयित व्यक्तीचा येथे राहण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे येथे कोणत्या प्रकारच्या तक्रारी राहिल्या नसल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. 

सोलापुरातील झोपडपट्ट्या अडचणीच्या 

ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा, नागरिकांनी सतर्क राहून चांगले व यशस्वी काम केले आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, रास्त धान्य दुकानदार, आशा व अंगणवाडी सेविका व प्राथमिक रुग्णालयांनी खरोखरच चांगले कामे केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी जरी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तरी त्याचा प्रसार हा रोखला गेला आहे. सोलापूर शहरात 200 पेक्षा जास्त झोपडपट्टी असून हे क्षेत्र दाट लोकसंख्येचे व दाटीवाटीने राहत असल्यामुळे थोड्या क्षेत्रात खूप मोठी लोकसंख्या असल्यामुळे लोकांना विलगीकरण करणे व एकमेकांशी संपर्क टाळणे सहजशक्‍य होत नाही. त्यामुळे शहरामध्ये फार दक्षतेने लक्ष देणे आवश्‍यक असते. तरीसुद्धा फैलाव होत आहे. यासाठी शहरात वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही श्री. भरणे यांनी सांगितले. 

पालकमंत्री भरणे म्हणाले... 
स्वॅबच्या बॅच तपासणीसाठी लागतात साधारणत: सात ते आठ तास 
स्वॅब तपासणी यंत्रणा 24 तास कार्यरत 
शहर पोलिसचे 14 जवान कोरोनाबाधित, दोन जवानांचा मृत्यू 
सीआरपीएफ, बीएसएफ किंवा इतर मनुष्यबळाची नाही आवश्‍यकता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Solapur system is honest, there is no need for outside system