कामगारांबाबत मोठा निर्णय! महाराष्ट्रातून 30 लाख परप्रांतीयांचे स्थलांतर; कामगारांना आता आठ तासांऐवजी 12 तासांची ड्यूटी

तात्या लांडगे
सोमवार, 11 मे 2020

राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय
राज्यातील काही उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. देशातील कोरोनाच्या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील परप्रांतीय कामगारांसह राज्यातील विविध भागातून आलेले कामगार त्यांच्या मूळगावी परतत आहेत. त्यामुळे राज्यातील उद्योगांसाठी कामगार कमी पडणार नाहीत, याची खबरदारी म्हणून कामगारांच्या कामांचे तास 8 ऐवजी 12 तास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती पाहून आणखी निर्णय घेतले जातील.
- दिलीप वळसे- पाटील, कामगारमंत्र

सोलापूर : कोरोनाचा विळखा राज्यभर वाढत असून मुंबई महापालिका, नवी मुंबई, ठाणे व पुणे, सोलापूर या महापालिका क्षेत्रात मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 11 हजार 506 रुग्ण होते तर 10 मेपर्यंत रुग्णांची संख्या तब्बल 22 हजार 171 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, राज्यातील सुमारे 30 लाखांहून अधिक परप्रांतीय त्यांच्या मूळगावी परत जात आहेत. त्यामुळे राज्यातील विविध उद्योगांसाठी लागणारे कामगार कमी पडण्याची शक्यता असल्याने कामगारांची ड्युटी आता आठ तासांऐवजी 12 तास करण्यास कामगार मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या सोलापुरातील 588 उद्योगासह राज्यभरातील काही उद्योग सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान, ज्या भागात कोरोना या विषाणूचा रुग्ण सापडला आहे त्या प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांना कामावर घेऊ नये, अशा प्रतिबंधित क्षेत्रातील कोणीही ही बाहेर पडू नये म्हणून पोलिसांमार्फत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील तब्बल 30 लाखांहून अधिक परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मूळगावी परत जाऊ लागले आहेत. रेल्वे व एसटीची वाट न पाहता बहुतांश मजुरांनी पायी प्रवास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर उद्योगांसाठी लागणाऱ्या कामगारांच्या संकटावर राज्य सरकारला नियोजन करावे लागणार आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उद्योजकांची वाढू लागली चिंता

राज्यात मोठ्या प्रमाणावर तरुण तथा कामगार वर्ग असतानाही परप्रांतीयांची संख्या मोठी होती. किमान वेतनावर पडेल ते काम करण्याची त्यांची खासियत आहे, असे मानले जाते. मात्र, आता राज्यातील वाढू लागलेला कोरोनाचा विळखा आणि लॉकडाऊन वाढण्याच्या धास्तीने हातावर पोट असलेले परप्रांतीय त्यांच्या मूळगावी परत जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल, असे मानले जात आहे. मात्र, आता आपल्याकडील तरुण तेवढ्याच पगारावर मिळेल ते काम करणार का आणि राज्यातील तरुण किमान वेतनावर तशी कामे करणार नसेल तर क कमी पडणाऱ्या कामगारांच्या संख्येवर सरकार कसा तोडगा काढणार याची चिंता उद्योजकांना सतावू लागली आहे.

राज्यातील परिस्थिती पाहून घेतला जाईल निर्णय
राज्यातील काही उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. देशातील कोरोनाच्या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील परप्रांतीय कामगारांसह राज्यातील विविध भागातून आलेले कामगार त्यांच्या मूळगावी परतत आहेत. त्यामुळे राज्यातील उद्योगांसाठी कामगार कमी पडणार नाहीत, याची खबरदारी म्हणून कामगारांच्या कामांचे तास 8 ऐवजी 12 तास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊननंतर परिस्थिती पाहून आणखी निर्णय घेतले जातील.
- दिलीप वळसे- पाटील, कामगारमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers now have 12 hours of duty