कमालच आहे... "या उद्योगात' कामगारसंख्या 44 हजार, गटविमा फक्त 3000 कामगारांचा!

श्रीनिवास दुध्याल
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

यंत्रमाग उद्योगातील कामगार अशिक्षित, अल्पशिक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. कुठलीही सामाजिक सुरक्षा नसल्याने कामगारावर जर अपघाताने अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर येते. त्याच्या पाल्यांचे शिक्षण रखडते. त्यांच्यासाठी ही गटविमा योजना फायदेशीर असतानाही केवळ तीन हजार कामगारांनी गटविमा उतरविल्याची बाब "बिट्रा पॉवरलूम सर्व्हिस सेंटर'कडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे.

सोलापूर : असंघटित क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी भारत सरकारच्या वस्त्र आयुक्त कार्यालयातर्फे गट विमा ही एलआयसीशी संलग्नित योजना राबविली जाते. केवळ वार्षिक 80 रुपये भरणाऱ्या यंत्रमाग कामगाराला नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, कायम अपंगत्व, अंशत: अपंगत्व अशा विविध दुर्घटनांमध्ये दीड ते चार लाखांचे विमा संरक्षण आहे. मात्र कुठलीही सामाजिक सुरक्षा नसलेल्या येथील 44 हजार यंत्रमाग कामगारांपैकी केवळ तीन हजार कामगारांनीच गट विमा उतरवल्याचे दिसून आले.

हेही वाचा - "या' दूध संघाच्या अडचणीत वाढ

जाणीव-जागृतीचा अभाव
धोकादायक व शारीरिक कष्टाच्या यंत्रमाग उद्योगाच्या विविध विभागांतील कामगार लूमचे धोटे उडून किंवा इतर कारणांमुळे अपघातात जखमी होतात. अपघाती मृत्यूचे प्रसंगही घडले आहेत. या क्षेत्रातील कामगार अशिक्षित, अल्पशिक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. कुठलीही सामाजिक सुरक्षा नसल्याने कामगारावर जर अपघाताने अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर येते. त्याच्या पाल्यांचे शिक्षण रखडते. त्यांच्यासाठी ही गटविमा योजना फायदेशीर असतानाही केवळ तीन हजार कामगारांनी गटविमा उतरविल्याची बाब "बिट्रा पॉवरलूम सर्व्हिस सेंटर'कडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. यंत्रमागधारकांकडून कामगारांपर्यंत या योजनेबद्दल जाणीव-जागृती होणे गरजेचे आहे.

दहा वर्षांतील स्थिती (कंसात गटविमाधारक कामगार)
90 हजार कामगारसंख्या असताना
- 2010-11 (7513)
- 2011-12 (4940)
- 2012-13 (4920)
- 2013-14 (5100)
84 हजार कामगारसंख्या असताना
- 2014-15 (5600)
- 2015-16 (5400)
- 2015-17 (4800)
- 2017-18 (3200)
44 हजार कामगारसंख्या असताना
-2018-19 (3043)

विम्याची वैशिष्ट्ये
यंत्रमाग उद्योगातील विणकर, स्विस्टिंग, वायंडिंग, वार्पिंग, गारमेंट, नीटिंग व सायझिंग आदी विभागातील कामगारांसाठी ही गटविमा योजना राबवण्यात येते. यात 18 ते 50 वयोगटातील कामगाराने वार्षिक हप्ता केवळ 80 रुपये भरायचे असतात. वस्त्रोद्योग खात्यातर्फे 162 व सामाजिक निधी सहभाग 100 रुपये असा एकूण 342 रुपये वार्षिक हप्ता असतो. विम्याच्या वर्षभराच्या कालावधीत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघाती मृत्यू झाल्यास चार लाख तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख तर अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची विमा रक्कम अदा केली जाते. त्याचबरोबर विमाधारकांच्या इयत्ता नववी ते बारावीच्या पाल्यांना वार्षिक 1200 रुपये स्कॉलरशिप मिळते.

कारखानदारांना परिपत्रक देणार
यंत्रमाग उद्योगातील कामगार जनश्री विमा भरतात. त्यांची संख्या तीन हजारांपर्यंत आहे. भारत सरकारच्या वस्त्र आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणारी गटविमा ही योजना कामगारांसाठी खूपच उपयुक्त असून, कामगारांचा विमा उतरवण्यासाठी संघातर्फे प्रोत्साहित करणार आहे. याबाबत परिपत्रक काढून यंत्रमागधारकांना त्यांच्या कामगारांचा गटविमा उतरविण्यासाठी कळविले जाईल.
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The workforce is 44 thousand, group insuranced only 3000 workers