जागतिक हृदयदिन विशेष : दिल को संभालो... दिल की सुनो ! 

World Heart Day
World Heart Day

जीवनातील ताण-तणाव, व्यवसायातील चढ-उतार, मनाची अशांतता या सर्व गोष्टी हृदयविकाराला खतपाणी घालतात. शरीराने जे स्थूल आहेत त्यांना हा धोका जास्त संभवतो. रात्रीची जागरणे, घड्याळाच्या काट्यानुसार पळत राहणे, अति महत्त्वाकांक्षा, जीवनाबद्दलच्या अफाट कल्पना याही हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. धूम्रपानाचे व्यसन हे अतिरक्तदाबासाठी कारण ठरते व हृदयरोगाला आमंत्रणच देते. तंबाखू व दारूच्या व्यसनांनी सुद्धा खूप मोठा धोका संभवतो, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पागे यांनी जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

हृदयाचं दुखणं ओळखायचं कसं? 
अचानक छातीमध्ये दुखणे, खांदा व हात दुखणे, घाम सुटणे, धडधड करणे, उलटी होणे, बेचैन वाटणे अशी हृदयाच्या त्रासाची लक्षणे असू शकतात. बऱ्याच वेळा मधुमेही लोकांना छातीत दुखण्याचे प्रमाण जास्त असू शकते किंवा नसते, तर अशा लक्षणांना दुर्लक्ष न करता डॉक्‍टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले. हृदयरोगाचे निदान प्राथमिकतेचे ईसीजीने (हृदयाचा आलेख) करतात. गरज भासली तर हृदयाची इकोकार्डिओग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट यानेसुद्धा निदान करता येते. बऱ्याच वेळेला पहिल्या ईसीजीमध्ये खूप काही माहिती मिळत नाही तेव्हा डॉक्‍टर परत ते करण्याचा किंवा ऍडमिट होण्याचा सल्ला देतात, तो रुग्णांनी गांभीर्याने घ्यावा. अँजिओग्राफी हा हृदयरोग निदानाचा आरसा मानला जातो. तपासणीद्वारे रक्तवाहिन्यांमध्ये असलेले अडथळे लगेच लक्षात येतात. 

हृदयविकार म्हणजे काय? 
हृदयविकार म्हणजे काय? तो ओळखायचा कसा? त्याला प्रतिबंध कसा करायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची? हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. सद्यपरिस्थितीमध्ये देशात 5.45 कोटी हृदयरुग्ण आहेत. हृदयरोगामुळे जगातील साधारणतः 16 टक्के रुग्णांचे मृत्यू हे फक्त भारतातील असतात. गेल्या 25 वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण हे दुपटीहून अधिक वाढले आहे. सध्याच्या कोरोनाच्या साथीमध्ये ज्यांना हृदयरोग व रक्तदाब आहे त्यांना जास्त धोका जाणवतो आहे. बऱ्याच वेळेला हृदयरोग अचानक समोर येतो, तर बऱ्याच जणांना कल्पना देतो. या रुग्णांना काही वेळेला जिने चढताना छातीत दुखण्याचा त्रास होतो, रस्त्यावरचे चढ चढताना त्रास होतो, फिरताना किंवा सायकलिंग करताना छातीत भरून किंवा दडपण येते असे काही संकेत हृदयरोगाचे असू शकतात. या संकेतांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी तपासणी करणे गरजेचे आहे. 

हृदयविकार टाळू शकतो... 
हृदयविकाराच्या बाबतीत उपचाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डॉक्‍टरांनी लिहून दिलेली औषधे नियमित घ्यावीत व ती डॉक्‍टरांना न सांगता बंद करू नयेत. गेल्या काही वर्षांपूर्वी हृदयरोग हा वयाच्या 40 वर्षांनंतरचा आजार असं मानलं जायचं, पण तो आता 22-25 वर्षांच्या तरुणांमध्ये पण आढळत आहे, ही निश्‍चितच चिंताजनक बाब आहे. या हृदयविकाराला आपण काही प्रमाणात लांब ठेवण्यासाठी रोजचा नियमित व्यायाम जसे की चालणे, पोहणे, पुरेशी झोप, मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहणे व व्यसनांपासून दूर राहिल्यास आपण हृदयविकार टाळू शकतो. 

तज्ज्ञांकडून सल्ला व नियमित तपासणी आवश्‍यक 
कमीतकमी कर्बोदके आणि जास्तीत जास्त प्रथिने हा संतुलित आहार अपेक्षित आहे. मिठाचे प्रमाण नगण्य असावे आणि संध्याकाळचे जेवण व झोप यामध्ये कमीत कमी दोन ते तीन तासांचे अंतर असावे. जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी आपले आवडते छंद जोपासावेत. काही शंका असल्यास लगेच तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा व नियमित शारीरिक तपासणी करून घ्यावी. 
- डॉ. श्रीकांत पागे, एम. डी. (मेडिसीन) कन्सल्टंट फिजिशियन 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com