फेसबुक लाइव्हद्वारे रविवारी जागतिक योग दिन होणार साजरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

रविवार दिनांक 21 जून 2020 रोजी हा योगदिन कोरोनामुळे सामूहिकपणे साजरा करता येणार नाही. पण या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे. म्हणून हा योग उत्सव आपण पतंजली योग समिती व वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून फेसबुक लाइव्हच्या मदतीने आपण घरीच साजरा करणार आहोत.

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा जागतिक योगदिन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पतंजली योगपीठच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली. 

येत्या 21 जून रोजी सहावा आंतरराष्ट्रीय योगदिन जगभर साजरा केला जाणार आहे. मागील पाच वर्षांपासून हा दिवस आपण अत्यंत उत्साहाने साजरा केला आहे. भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न या दिनानिमित्ताने होते.

मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर आध्यात्मिक उन्नतीची परिसीमा योग साधनेतून साधता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि डिसेंबरमध्ये त्याला मान्यता मिळाली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. 

यावर्षी म्हणजेच रविवार दिनांक 21 जून 2020 रोजी हा योगदिन कोरोनामुळे सामूहिकपणे साजरा करता येणार नाही. पण या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे. म्हणून हा योग उत्सव आपण पतंजली योग समिती व वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून फेसबुक लाइव्हच्या मदतीने आपण घरीच साजरा करणार आहोत.

रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत पतंजली योग समिती महाराष्ट्रद्वारा प्रत्येक जिल्ह्यातून फेसबुक लाइव्हद्वारा हा कार्यक्रम होणार आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने स्वामी रामदेव महाराजांच्या सानिध्यात हरिद्वारवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आस्था चॅनल तसेच फेसबुक लाइव्हद्वारे कार्यक्रम पाहून आपण घरीच योग करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा, असे आवाहन अळ्ळीमोरे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Yoga Day will be celebrated on Sunday through Facebook Live