धक्कादायक !आता बार्शीत पडली "कोरोना देवी'ची भर; कोंबड्या-बकऱ्यांचा नैवेद्यही

Corona Devi.
Corona Devi.

बार्शी (सोलापूर) : श्रद्धा अन्‌ अंधश्रद्धेच्या चाकोरीतून समाजातील अनेकजण जात असताना, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे लॉकडाउनमध्ये अंधश्रद्धेचा कहर झाला आहे. "कोविड-19 या विषाणूची चेन्नई येथून देवी आली' असे म्हणत कोरोना देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. देवीला नैवेद्य, कोंबडी, बकरे बळी दिल्याने कोरोना झालाच नाही असे ठामपणे सांगितले जात आहे. 

एका महिलेसह दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल
ना मास्क वापरला, खोकला नाही, सर्दी नाही, हातही धुतले नाहीत, असे सोलापूर रोड, पारधी वस्तीमधील नागरिक सांगत आहेत. बार्शी शहर पोलिसांना या घटनेची माहिती समजताच सोलापूर रोड, पारधी वस्ती येथे जाऊन पाहणी केली. देवीची प्रतिष्ठापना पाहिली, रहिवासी महिला व पुरुषांची माहिती घेऊन एका महिलेसह दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
सोमनाथ परशुराम पवार (वय 42), ताराबाई भगवंत पवार (वय 52, दोघेही रा. सोलापूर रोड, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस रविकांत लगदिवे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान घडली. 

देवीला मरेपर्यंत मानणार, सेवा करणार
आमच्यावर देवीची कृपा आहे, आम्ही मागील अडीच महिन्यांपासून तोंडाला मास्क लावत नाही, हात धूत नाही अथवा आम्हाला सर्दी, खोकलाही झाला नाही. आमचे मुंबई, पुणे येथे नातेवाईक आहेत. सेवा केली, पूजापाठ केला, बकरे, कोंबडी नैवेद्य दाखवले अन्‌ देवीने सुखी ठेवले, असे येथील महिला सांगत आहेत. "ओटी भरल्यास रुग्ण बरा होतो, मी रुग्णालयातून देवीमुळेच घरी परत आले. कोरोना बाईचा आशीर्वाद आम्ही विसरू शकत नाही. देवीला मरेपर्यंत मानणार, सेवा करणार, आयुष्यभर सांभाळणार' असे ठाम मत व्यक्त करण्यात येत आहेत. 

अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी या भागातील नागरिकांचे प्रबोधन
याबाबत बार्शी शहर पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम, अफवा पसरवून कोरोना रोगाचा प्रसार करणे यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी या भागातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. 

अंधश्रद्धेचे निर्मूलन, उच्चाटन केले पाहिजे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बाशीचे सचिव विनायक माळी म्हणाले, मनाच्या भावनेतून देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे. अंधश्रद्धेतून आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण होत आहे. शासनाने अंधश्रद्धेचे निर्मूलन, उच्चाटन केले पाहिजे. कोरोना विषाणू आहे हे जागतिक संघटनेने म्हटले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com