
कोरोनामुक्त झालेल्यांचा वयोगट
शून्य ते 10 वर्षे : 64
11 ते 20 वर्षे : 90
21 ते 30 वर्षे : 179
31 ते 40 वर्षे : 168
41 ते 50 वर्षे : 117
51 ते 60 वर्षे : 85
61 ते 70 वर्षे : 54
71 वर्षांवरील : 22
एकूण : 779
(कोरोनामुक्तची स्थिती जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची)
सोलापूर : सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन (शुक्रवारी, ता. 12) दोन महिने झाले. 12 एप्रिलपर्यंत कोरोनाचा लवलेशही नसलेले सोलापूर नंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. अवघ्या दोन महिन्यांत सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता दोन हजारांच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीही कोरोनामुक्त होण्याचेही सोलापुरातील प्रमाण चांगले आहे. एवढी एकमेव जमेची बाजू सोलापूरसाठी मानली जात आहे. 51 वर्षांवरील तब्बल 161 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
सोलापुरात कोरोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये 51 वर्षांवरील व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजार असलेल्या व्यक्तीही कोरोनाला बळी पडत आहेत. 51 वर्षांवरील व्यक्तींना व लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे. 51 वर्षांवरील व्यक्तींना व लहान मुलांना अधिक धोका असतानाही सोलापुरातील या वयोगटातील कोरोनाबाधित कोरोनामुक्त होत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी काळजी करू नये, स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न
जिल्हा प्रशासन, राज्य सरकार सोलापूरकरांच्या सोबत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वच यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. शासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे.
- दत्तात्रेय भरणे,
पालकमंत्री, सोलापूर
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
सोलापूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार हे सोलापूरकरांच्या सोबत आहे. नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप व सकस आहार आवश्यक आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मनोबल चांगले ठेवा. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- मिलिंद शंभरकर,
जिल्हाधिकारी, सोलापूर