कासेगाव येथे जागृत यल्लामा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 9 ते 11 जानेवारी दरम्यान भरणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पंढरपूर (सोलापूर) : राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कासेगाव (ता. पंढरपूर) येथील यल्लामा देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रतिकात्मक स्वरूपात यात्रेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. या संदर्भात बुधवारी (ता. 6) प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
या वेळी विजयसिंह देशमुख, वसंतराव देशमुख, प्रशांत देशमुख, तहसीलदार विवेक साळुंखे, पोलिस निरीक्षक किरण अवचर आदींसह इतर ग्रामस्थ व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कासेगाव येथे जागृत यल्लामा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 9 ते 11 जानेवारी दरम्यान भरणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने अनेक यात्रा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. यामध्ये आता कासेगाव येथे भरणारी यल्लामा देवीची यात्राही रद्द करण्यात आली आहे. मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन व प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून साजरी केली जाणार आहे.
यात्रेत गर्दी होऊ नये यासाठी मंदिर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. यात्रे दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल