प्लॉट घेण्यासाठी ठेवलेल्या रकमेसाठी चिमुकल्याचे अपहरण ! 17 तासांत पोलिसांना मिळाले 'यश'

तात्या लांडगे
Tuesday, 10 November 2020

यश गप्प गेल्याने पोलिसांना संशय आला 
मंदिर परिसरात सर्व सवंगड्यांसोबत खेळणारा यश गोंधळ न करता कोणासोबतही जाणार नाही, याचा पोलिसांनी अंदाज घेतला आणि तो ओळखीच्याच कोणासोबत गेल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक पथकाची मदत घेत सागरवर वॉच ठेवला. दिपक कोळी हे रेल्वे स्थानकात हमालीचे काम करतात. त्यांनी स्वत:चा प्लॉट घेण्यासाठी काही पैसे जमा करुन ठेवले होते. त्याची माहिती सागरला होती. त्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे.

सोलापूर : कार्यक्रमानिमित्त बसवेश्‍वर नगरातील मंदिरात चिमुकल्यांसमवेत गेलेला यश कार्यक्रम संपल्यानंतरही घरी परतलाच नाही. चिंतेतील आई- वडिलांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, परिसरात शोधाशोध सुरु केली. मात्र, यशचा थांगपत्ता लागत नसल्याने माता- पित्यांची चिंता वाढली. त्याचवेळी दिपक यांना अनोळखी नंबरवरुन कॉल आला आणि परिसरातील स्मशानभूमीत पाच लाख रुपये घेऊन ये, तुझ्या मुलाला मी पळवून नेल्याचे समोरुन सांगण्यात आले. त्यावेळी दिपक स्मशानभूमीत पोहचले, परंतु त्याठिकाणी कोणीच नसल्याने दिपक यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी 17 तासांत आरोपीला पकडले.

 

यश गप्प गेल्याने पोलिसांना संशय आला 
मंदिर परिसरात सर्व सवंगड्यांसोबत खेळणारा यश गोंधळ न करता कोणासोबतही जाणार नाही, याचा पोलिसांनी अंदाज घेतला आणि तो ओळखीच्याच कोणासोबत गेल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक पथकाची मदत घेत सागरवर वॉच ठेवला. दिपक कोळी हे रेल्वे स्थानकात हमालीचे काम करतात. त्यांनी स्वत:चा प्लॉट घेण्यासाठी काही पैसे जमा करुन ठेवले होते. त्याची माहिती सागरला होती. त्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चिकुकल्याचे अपहरण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलिस आयुक्‍त प्रिती टिपरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी तांत्रिक पथक, सायबर क्राईमच्या मदतीने मोबाइल लोकेशन, संवादाचा तपास सुरु केला. तत्पूर्वी, संशयित आरोपी सागर कृष्णप्पा गायकवाड (रा. महालिंगेश्‍वर नगर, बसवेश्‍वर नगराजवळ) याने यशला ऊस देण्याचे अमिष दाखवून मंदिर परिसरातून पळवून नेले. त्यानंतर सागर याने यशला स्मशानभूमीत थांबवून घरी आला आणि स्वत:ची दुचाकी (एमएच- 09, बी- 0905) घेऊन गेला. त्याने यशला घेऊन एनटीपीसीमार्गे औराद (ता. दक्षिण सोलापूर) गाठले. त्याने चुलत भाऊ मल्लिकार्जून रामचंद्र गायकवाड याला फोन करुन यशला चुलत आज्जी कस्तुराबाई गुरुबाळ गायकवाड यांच्याकडे ठेवले. त्यानंतर तो तिथून पुन्हा घरी निघाला आणि सिध्देश्‍वर साखर कारखान्याजवळ आल्यानंतर त्याने पुन्हा दिपकला फोन केला आणि पाच लाख रुपयांची मागणी केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीला डीबी पथकातील राजकुमार तोळणुरे, शावरसिध्द नरोटे, श्रीरंग खांडेकर, सचिन सुरवसे, आयाज बागलकोटे, प्रकाश निकम, इम्रान जमादार, रोहन ढावरे, पिंटू जाधव, रमेश सोनटक्‍के, विशाल बोराडे, लक्ष्मण वसेकर, बालाजी जाधव, उदयसिंह साळुंखे यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन पकडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yash was lured to give sugarcane; The accused was caught by the police within 17 hours