खूषखबर! उजनी ते सोलापूर नवी पाइपलाइन "या' दिवसापर्यंत होणार पूर्ण; आज झाले भूमिपूजन 

तात्या लांडगे 
Wednesday, 9 September 2020

शहरातील काही भागातील पथदिवे वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारीवर आयुक्‍तांनी सक्‍त सूचना करीत दुरुस्तीचे आदेश दिले. स्मार्ट स्कूल, विद्युत दाहिनी आणि रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्यावरही या वेळी चर्चा झाली. तत्पूर्वी, उजनी ते सोलापूर दुहेरी पाइपलाइन टाकण्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याचेही निर्देश दिले. ही पाइपलाइन पूर्ण झाल्यानंतर वारंवार होणारी पाणी गळती थांबणार असून शहराचा विस्कळित पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्‍वास या वेळी व्यक्‍त करण्यात आला. 

सोलापूर : उजनी ते सोलापूर ही 110 किलोमीटर पाइपलाइन नव्याने टाकण्यासाठी 9 सप्टेंबर 2019 मध्ये मान्यता मिळाली. मक्‍तेदार नियुक्‍त केल्यानंतर त्यांना 30 महिन्यांची मुदत देण्यात आली. मात्र, अद्याप कामाला सुरवात झालेली नव्हती. आता महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. आगामी दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. आज (बुधवार) या कामाचे भूमिपूजनही पार पडले. 

हेही वाचा : कोरोनावर कोट्यवधींचा खर्च पण वीज ग्राहकांवर दया का नाही? "राष्ट्रवादी'चा मुख्यमंत्र्यांना सवाल 

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सल्लागार समिती व महापालिका पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. 8) बैठक पार पडली. या वेळी खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेते श्रीनिवास करली, महिला व बालकल्याण समिती सभापती कुमुद अंकाराम, परिवहन सभापती जय साळुंखे, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज खरादी, नगर अभियंता संदीप कारंजे, प्रभारी सार्वजनिक अभियंता संजय धनशेट्टी, नगर रचना विभागाचे संचालक लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते. आज झालेल्या भूमिपूजनावेळीही हे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

शहरातील काही भागातील पथदिवे वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारीवर आयुक्‍तांनी सक्‍त सूचना करीत दुरुस्तीचे आदेश दिले. स्मार्ट स्कूल, विद्युत दाहिनी आणि रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्यावरही या वेळी चर्चा झाली. तत्पूर्वी, उजनी ते सोलापूर दुहेरी पाइपलाइन टाकण्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याचेही निर्देश दिले. ही पाइपलाइन पूर्ण झाल्यानंतर वारंवार होणारी पाणी गळती थांबणार असून शहराचा विस्कळित पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्‍वास या वेळी व्यक्‍त करण्यात आला. तसेच पार्क स्टेडियमचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना आयोजित करण्यावरही चर्चा झाली. महापालिकेच्या शाळांना स्मार्ट स्कूलच्या धर्तीवर अत्याधुनिक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In a year and a half there will be a new pipeline from Ujani to Solapur