
केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशय परिसरात विविध पक्ष्यांच्या कसरतींमुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. गतवर्षी सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने उजनी जलाशयावर येणारे विविध परदेशी पक्षी इतर ठिकाणच्या विविध पाणवठ्यांवर विभागले गेले, तर गेल्या पाच महिन्यांपासून उजनी जलाशयाला प्रतीक्षा असलेले फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख या उजनीचे आकर्षण असणाऱ्या पक्ष्यांनी तर यावर्षी उजनीकडे पाठच फिरवल्याचे दिसून आले आहे.
त्यातच कोरोनाचे संकटही पाठ सोडायला तयार नसल्याने पर्यटकांनीही उजनी जलाशयाकडे पाठ फिरवली आहे. फ्लेमिंगोबरोबर परदेशी व देशातील अंतर्गत भागातून या ठिकाणी येऊन दाखल होणारे क्रौंच, लेसर फ्लेमिंगो, शेंडीसरी बदक, उचाट्या, मुग्धबलाक या पक्ष्यांनी सुद्धा यावर्षी पाणलोट क्षेत्रात आपले अस्तित्व दाखवले नाही. मात्र फ्लेमिंगो आले असले तरी त्यांची संख्या नगण्य असून ते पर्यटकांना सुलभतेने दर्शन देत नाहीत.
नोव्हेंबर ते एप्रिल हा पक्षी पर्यटनाचा काळ असतो. उजनी परिसरातील कोंढार चिंचोली, कात्रज, पळसदेव, डिकसळ, भिगवण आदी भागात पक्षी निरीक्षण मोठ्या प्रमाणावर होते. पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणचे पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक, पक्षीप्रेमी या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात व मच्छिमारांच्या नौकांद्वारे नौकानयनही करतात. परंतु, यावर्षी उजनी जलाशय परिसरातील पाणीही उशिराने कमी झाल्याने दलदलीच्या व पाणथळ जागा उशिराने रिकाम्या झाल्या, हे पक्षी न येण्याचे मुख्य कारण ठरले आहे.
आता सध्या उजनी जलाशयाचा पाणी साठा साठ टक्क्याच्या आसपास आल्याने दलदलीच्या व पाणथळ जागा मोठ्या प्रमाणावर रिकाम्या झाल्या असल्या तरी विदेशी पक्ष्यांचा येण्याचा काळ निघून गेला आहे. त्यामुळे विदेशी पक्षी उजनीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पक्षी अभ्यासक, निरीक्षक व पक्षीप्रेमी यांनीही उजनीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. उजनी जलाशयावर स्थानिक पक्षी मात्र मोठ्या संख्येने आहेत मात्र परदेशी पाहुण्यांच्या कवायती यावर्षी दुर्मिळ झाल्या आहेत. परदेशी पक्षीच न आल्याने पर्यटक, पक्षीनिरीक्षक, पक्षी अभ्यासक, पक्षीप्रेमी यांची संख्याही मर्यादित झाल्याने पर्यटन व्यवसायावरही गदा आली आहे.
सद्य:स्थितीत फ्लेमिंगो दरवर्षीच्या तुलनेत अगदीच नगण्य म्हणजे 30-35 च्या संख्येत आहेत. जलाशयामधील बेटे अद्याप पाण्याखाली आहेत व हा पक्षी माणसांपासून पुरेसे अंतर राखून विहार करतो त्यामुळे उपद्रव टाळण्यासाठी किनाऱ्यावर थांबण्यास पसंती देत नाहीत. पाण्यातील बेटे उघडी झाल्यानंतरच हे पक्षी पुरेशा संख्येने दिसतील. सध्या फ्लेमिंगो मुंबईजवळील खाडी प्रदेश तसेच मराठवाडा, विदर्भातील तलाव अशा अन्य जलाशयांकडे आकर्षिले गेले आहेत. परंतु मोरशराटी, मुग्धबलाक, चक्रवाक बदक, जांभळी पाणकोंबडी, पट्टकदंब, समुद्रपक्षी या पक्ष्यांची संख्या लक्षवेधक ठरत आहे. गॉडवीटने मात्र शेकडो संख्येत हजेरी लावली आहे. फ्लेमिंगोसह येथे स्थलांतर करणारे अन्य पक्षी हे सुद्धा निसर्गसौंदर्याने नटलेले महत्त्वाचे घटक आहेत, या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरं तरं संतुलित पर्यटन होणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून पर्यटकांसाठी किमान पायाभूत सुविधा व सुरक्षाविषयक उपाययोजना केल्यास उजनी जलाशयाची जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ होण्याकडे नक्कीच वाटचाल यशस्वी होईल.
उजनी जलाशयाचे खास आकर्षण असलेले रोहित अर्थात फ्लेमिंगो या वर्षी येण्याची प्रतीक्षा संपल्याने व कोरोना महामारीची दुसरी लाट डोके वर काढल्याने पक्षीप्रेमी व पर्यटक उजनीकडे न फिरकण्याच्या मन:स्थितीत असल्याचे जाणवते आहे.
- डॉ. अरविंद कुंभार,
पक्षी अभ्यासक
प्रखर उन्हात उजनी परिसरात भटकंती करून काहीच हाती लागत नाही. या कारणामुळे पर्यटकांनी उजनी जलाशयाकडे भटकंतीसाठी न येण्याचं पसंत केलं असावं.
- कल्याणराव साळुंखे,
पक्षी निरीक्षक
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.