
सोलापूर ः घरापासून दूर गेलेल्या चिमण्या पुन्हा परत येतील का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आजही अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत. मानवाची बदलती जिवनशैली, घरट्यासाठी कोनाडे नसलेली घरे व मोबाईलच्या रेंज ही कारणे मांडली जात आहेत. तरीही त्यावर उपाय देखील काढले जात आहेत.
मोबाईल सुरु झाल्यापासून चिमण्या घरांच्या परिसरात राहत नाहीत असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात पक्षी निरीक्षकांनी अनेक कारणे शोधली आहेत. एकतर नव्या वास्तू आराखड्यानुसार बांधल्या गेलेल्या घरांच्या भिंतीमध्ये कोनाडे किंवा काही खळगे नाहीत.
चिमण्यांचा अधिवासासाठी बाभळीचे झाड महत्त्वाचे मानले जाते. या झाडांची संख्यादेखील अत्यंत कमी होत चालली आहे. त्यासोबत धान्याचे पॅकेजिंग वाढल्याने चिमण्यांना खाद्य राहत नाही. मोबाईल लहरींचा हस्तक्षेपदेखील होतो आहे. या सोबत पिकावर फवारली जाणाऱ्या रसायनामुळे त्यांच्या खाद्याला बाधा येत आहे. चिमण्या त्यांच्या पिलांना सुरवातीला सुरवंट व किटकासारखे खाद्य खाऊ घालतात. पण रासायनिक शेतीमुळे याही खाद्याचा अडथळा झाला आहे. नव्या बांधकाम शैलीने पारवे, कावळे या मोठ्या पक्ष्यांची वस्ती वाढल्याने चिमण्यांची अडचण झाली आहे.
होय, अंगणात चिमण्या आहेत
येथील महादेव डोंगरे यांनी त्यांच्या घराच्या छताच्या खालून व खिडक्यांच्या छताच्या नजीक एकूण चार कृत्रिम घरटी बसवली आहेत. प्लॅस्टिकच्या पाईपचे तुकडे एका बाजूला बंद करून हे पाईप अडकवले. तसेच चिमण्यासाठी पाणीदेखील असते. सकाळी चिमण्यांच्या किलबिलाटांने जाग येते तर दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट सुरु असतो.
प्रयत्न व्हायला हवेत.
घराच्या परिसरात राहणाऱ्या चिमण्या पुन्हा एकदा अंगणात याव्यात, यासाठी कृत्रिम घरटी, पिण्यासाठी पाणी, थोडे धान्य या गोष्टी करता आल्या तर त्याचे परिणाम मिळू शकतात. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
- मोनिका माने, पक्षी निरीक्षक, सोलापूर
लोकांमध्ये जाणीव-जागृती व्हावी
जागतिक चिमणी दिनी लोकांमध्ये चिमणी वाचवण्यासाठी जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील महत्त्व समजवणे, शहरीकरणामुळे तिच्या नैसर्गिक आधिवासास निर्माण झालेली मर्यादा समजून घेत या परिस्थितीत तिच्या जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण झाली पाहिजे.
- वैशाली रविंद्र डोंबाळे, निसर्ग मित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.