esakal | तरुणाच्या धाडसाचे कौतुक ! दांडके घेऊन टाकीवर चढलेल्या मनोरुग्णाला उतरवले शिताफीने 

बोलून बातमी शोधा

Pangari}

पांगरी पोलिस ठाण्यासमोरील नवीन पाण्याच्या टाकीवर तब्बल तीन तास चढून बसलेल्या अज्ञात तरुणाला तांदूळजा (जि. लातूर) येथील तरुण बाबासाहेब वाघचौरे यांनी टाकीवर चढून शिताफीने खाली उतरवले. यामुळे पोलिस व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या धाडसी कार्याबद्दल बाबासाहेब वाघचौरे या तरुणाचे कौतुक होत आहे. 

तरुणाच्या धाडसाचे कौतुक ! दांडके घेऊन टाकीवर चढलेल्या मनोरुग्णाला उतरवले शिताफीने 
sakal_logo
By
बाबासाहेब शिंदे

पांगरी (सोलापूर) : पांगरी पोलिस ठाण्यासमोरील नवीन पाण्याच्या टाकीवर तब्बल तीन तास चढून बसलेल्या अज्ञात तरुणाला तांदूळजा (जि. लातूर) येथील तरुण बाबासाहेब वाघचौरे यांनी टाकीवर चढून शिताफीने खाली उतरवले. यामुळे पोलिस व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या धाडसी कार्याबद्दल बाबासाहेब वाघचौरे या तरुणाचे कौतुक होत आहे. 

रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात तरुण पोलिस ठाण्यासमोरील टाकीवर अचानक हातात दांडके घेऊन चढला. ही वार्ता तत्काळ गावात सर्वत्र पसरली आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली. सुरवातीस तो तरुण खाली उतरून येईल असे अनेकांना वाटले. जसजसा वेळ जाईल तसे घटनेचे गांभीर्य वाढू लागले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस पाण्याच्या टाकीजवळ येऊन त्या तरुणास खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करू लागले. परंतु तो कोणास दाद देईना. 

या वेळी पोलिसांनी पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला. त्या अज्ञात तरुणाच्या हातात लाकडी दांडके होते. वर गेल्यानंतर झटापट केली तर खूप महागात पडणार, त्यामुळे त्यास खाली उतरवण्यासाठी प्रयत्न चालू केले. तो तरुण बडबड करत टाकीच्या सभोवती फिरत होता. त्यामुळे टाकीवर जाण्याचे कोणीच धाडस केले नाही. 

या वेळी बार्शीहून लातूरकडे चाललेला दुचाकीस्वार बाबासाहेब वाघचौरे या तरुणाने रस्त्यालगत गर्दी पाहून मोटारसायकल थांबवून माहिती घेतली. त्या वेळी पाण्याच्या टाकीवर लातूरकडील एक तरुण चढला असून, वायफळ बडबड करत असल्याचे कळाले. त्यानंतर तो तरुण धाडस दाखवत टाकीवर चढला. त्या वेळी त्यास ग्रामस्थांनी व पोलिसांनी काळजी घ्या, त्याच्या हातात दांडके आहे, अंगावर आला तर लगेच खाली उतरा... अशा अनेक सूचनांचा पाऊस पाडला; मात्र वाघचौरे यांनी धाडस दाखवत पाण्याच्या टाकीवर चढून त्यास बोलते करत खाली उतरण्यासाठी तयार केले. थोड्या वेळेतच त्यास खाली उतरवून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

त्या तरुणाबद्दल माहिती विचारली असता, पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी सांगितले, की तो तरुण मनोरुग्ण होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल