
अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका विवाहित महिला ठार झाली आहे. ही घटना शनिवारी (ता. 5) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. जयश्री दयानंद शिंदे (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.
करमाळा (सोलापूर) : अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका विवाहित महिला ठार झाली आहे. ही घटना शनिवारी (ता. 5) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. जयश्री दयानंद शिंदे (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.
दोन दिवसांत दुसरा बळी बिबट्याने घेतला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या बिबट्याला तत्काळ ठार मारण्याची मागणी केली जात आहे. अंजनडोहपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गावडे वस्तीजवळ ही घटना घडली आहे.
जयश्री शिंदे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लिंबुणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजल्या तरी जयश्री शिंदे घरी आल्या नाहीत म्हणून लिंबुणीच्या बागेत तिच्या शोधासाठी तिचे पती दयानंद शिंदे हे गेले असता जयश्री शिंदे या दिसून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी हाका मारल्या, मात्र कोणताच आवाज न आल्याने दयानंद शिंदे यांनी बागेत शोधाशोध सुरू केली असता त्यांना लिंबुणीच्या बागेत रक्त सांडलेले दिसून आले. तेथेच त्यांचे मुंडके पडलेले दिसले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक वन संरक्षक संजय कडू, सहाय्यक वन संरक्षक बाळासाहेब हाके यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.
करमाळा तालुक्यात आलेला बिबट्या अहमदनगर, बीड जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आला असल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अहमदनगर, बीड भागात बिबट्याने चार बळी घेतले आहेत.
बिबट्याला ठार मारण्याची मागणी
फुंदेवाडी येथे गुरुवारी (ता. 3) कल्याण फुंदे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर आज (ता. 5) अंजनडोह (ता. करमाळा) येथे जयश्री शिंदे या विवाहितेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. फुंदेवाडी ते अंजनडोह हे साधारणपणे 18 ते 20 किलोमीटर अंतर आहे. दोन दिवसांत करमाळा तालुक्यातील दोन जणांचा बिबट्याने बळी घेतल्याने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे.
तर बिबट्याला मारण्याचे आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकर आदेश मिळताच बिबट्याला ठार केले जाईल, अशी माहिती वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक संजय कडू यांनी दिली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल